भविष्यात राम-लक्ष्मण जोडी एकत्र येईल; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संभाजी भिडेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 05:07 PM2022-11-02T17:07:56+5:302022-11-02T17:09:13+5:30
मी व्यक्तिगत स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही. भगवंताच्या कृपेने आपल्याला चांगले मुख्यमंत्री लाभले असं कौतुक संभाजी भिडे यांनी केले.
मुंबई - शिवसेना-भाजपा व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाहीत. राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत. भगवंताच्या कृपेने ती वेळ येईल आणि भविष्यात सगळे एकत्र येतील असा विश्वास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केला आहे. संभाजी भिडे यांनी मंत्रालयात जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीनंतर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यात ते बोलत होते.
संभाजी भिडे म्हणाले की, मी व्यक्तिगत स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही. भगवंताच्या कृपेने आपल्याला चांगले मुख्यमंत्री लाभले. धाडसाने अनेक निर्णय घेतात. प्रत्येक निर्णय उत्कृष्ट घेतले आहेत. बाळासाहेब शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे विचार घेऊनच पुढे आले. शिवसेना-भाजपा व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाही. राम लक्ष्मण एकत्र पाहिजेत. भगवंत त्यासाठी मदत करतोय. भविष्यात सगळे एकत्र येतील असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत शिवरायांचा वारसा संपूर्ण देशात आहे. जिथे जिथे हिंदुत्वाला मानणारी सरकार आहेत त्याठिकाणी विचारांचा वारसा आहे. बाळासाहेबांची मूर्तिमंत प्रतिमा उद्धव ठाकरेंमध्ये आहे. अतिशय चांगली व्यक्ती आहे. राजकारणात हेलकावे खात नाव भरकटली आहे. त्यांच्या मनात नसताना हे घडलं आहे. ते दुरुस्त होईल असं वाटतं असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"