संभाजी ब्रिगेड उतरणार राजकारणात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 03:11 AM2016-11-18T03:11:53+5:302016-11-18T03:11:53+5:30
३0 नोव्हेंबरला मुंबईत घोषणा; येणा-या सर्व निवडणुका लढणार!
राजरत्न सिरसाट
अकोला, दि. १७- जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवचरित्रावरील पुस्तकाला विरोध करू न राज्यात चर्चेत आलेल्या संभाजी ब्रिगेडने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर येत्या ३0 नोव्हेंबर रोजी मुंबईत याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असून, या घोषणेनंतर राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसह सर्वच निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वबळावर उमेदवार उभे करणार आहे.
संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील २५ वर्षांचा संघटनेचा लेखाजोखा बघितल्यानंतर संघटनेने सामाजिकदृष्ट्या केलेले काम उल्लेखनीय आहे. बहुजन समाजाला जोडण्यासाठी अनेक वैचारिक कार्यक्रम राबविले; असे असले तरी, विकासाच्या कुलुपाची चावी राजकारण आहे. राजकारणाच्या माध्यमातूनच सामाजिक, राजकीय तसेच विकासाचे प्रश्न सोडवता येतात, म्हणूनच शंभर टक्के समाजकारणासह शंभर टक्के राजकारण करण्यासाठीच राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडने घेतला आहे. राजकीय पक्ष स्थापन्यापूर्वी संभाजी ब्रिगेडने पक्षाचे विविध सेल सुरू करण्याचे नियोजन केले असून, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत महाराष्ट्र वैद्यक परिषद सेल निर्माण केला आहे. पक्षासोबत समविचारी संघटना जोडल्या जाणार आहेत. त्यासाठीचे प्रस्ताव पक्षाक डे प्राप्त झाले आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
राजकीय पक्ष म्हणून शेतकरी, ग्रामीण जनतेचे प्रश्न प्रामुख्याने पक्ष हातात घेणार असून, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, प्रत्येक गाव दारू मुक्त करणे आदींसाठीचा लढा पक्ष सुरुवातीला उभारणार आहे. पक्ष मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक उभारणार असून, माध्यमांच्याही क्षेत्रात पाऊल टाकणार आहे.
- संभाजी ब्रिगेडने मागील २५ वर्षे सामाजिक संघटना म्हणून काम केले आहे. आता राजकीय पक्षात संघटनेला परावर्तीत करण्यात येत आहे. ३0 नोव्हेंबर रोजी मुंबई वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यासाठी पक्षाने रितसर राजकीय पक्षाची मान्यता मिळवली आहे.
- पंकज जायले,जिल्हाध्यक्ष,
संभाजी ब्रिगेड,अकोला.
-शेतमालाला हमी भाव, दारुमुक्त गाव हे पक्षाचे घोषवाक्य असून, ३0 नोव्हेंबरला मुंबईत पक्ष स्थापना केली जाणार आहे.
सुभाष बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, वाशिम.