...आता संभाजी ब्रिगेडही राजकीय आखाड्यात!
By admin | Published: October 30, 2016 12:14 AM2016-10-30T00:14:03+5:302016-10-30T00:14:03+5:30
मराठा सेवा संघाची युवा शाखा असलेल्या संभाजी ब्रिगेडने आता राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे निंिश्चत केले असून निवडणूक आयोगाकडे पक्षाची
पुणे : मराठा सेवा संघाची युवा शाखा असलेल्या संभाजी ब्रिगेडने आता राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे निंिश्चत केले असून निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष विकास पासलकर यांनी याला शनिवारी दुजोरा दिला.
काही वर्षांपूर्वी शिवराज्य पक्ष म्हणून राजकारणात मराठा सेवा संघटेनेने प्रयोग केला होता. नुकत्याच राज्याच्या विविध भागात झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय झाला असून डिसेंबर अखेरीस मुंबईच्या ष्णमुखानंद हॉलमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे पक्षाची अधिकृत घोषणा करणार आहेत.
सामाजिक कार्य करणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या राजकीय आकांक्षा संभाजी ब्रिगेड पक्षाच्या माध्यमातून अंकुरीत झाल्या आहेत. या पक्षाच्या हालचाली समजल्यानंतर प्रस्थापित पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेतकरी आणि कामगारांशी निगडीत प्रश्नांवर मराठा सेवा संघ व शेतकरी कामगार पक्ष यांची समान भूमिका असल्याने ब्रिगेड शेकापमध्ये विलीन होण्याच्या दृष्टीने सहा महिन्यांपासून चर्चा सुरु होती. सत्यशोधक चळवळीच्या मुशीतून पुढे आलेल्या शेकापची पाळेमुळे पश्चिम महाराष्ट्रात व मराठवाड्यात पूर्वी रुजली होती. सध्या रायगड वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये या पक्षाचे फारसे अस्तित्व नसल्याने शेकापनेही संभाजी ब्रिगेडच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र ब्रिगेडने अचानक नोंदणी करुन सगळ््यांना धक्का दिला आहे. मनोज आखरे हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असून मराठा सेवा संघाचे वरिष्ठ पदाधिकारी पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव सौरभ खेडकर हे सरचिटणीस असणार आहेत. (प्रतिनिधी)