मोठी राजकीय घडामोड! शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा; उद्धव ठाकरेंसोबत निवडणुका लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 13:35 IST2022-08-26T13:29:16+5:302022-08-26T13:35:47+5:30
Sambhaji Brigade- Shivsena Alliance news: सर्वोच्च न्यायालयावर आमचा लढा सुरु आहे, हा जो निकाल लागेल त्यावर शिवसेनेचे भविष्यच नव्हे तर देशात लोकशाही राहिल की नाही हे ठरविणारा निकाल असणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोठी राजकीय घडामोड! शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा; उद्धव ठाकरेंसोबत निवडणुका लढणार
महाराष्ट्राच्या राजकारणाला आज वेगळी कलाटणी लागणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज या युतीची घोषणा केली.
संयुक्त मेळावे घेण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले आहे. गेल्या दोन अडीज वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना चांगले लोकहित पाहिले. चांगले निर्णय घेतले. आता लोकशाही धोक्यात आलेली आहे. छोटे पक्ष, संघटना जर वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागले, यावर आमचे एकमत झाले आहे. शिवराय, शाहू, फुले,आंबेडकर,संविधान याला मानणाला नवतरुण तयार करणे यासाठी आम्ही काम करू. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र लढण्याची तयारी केली जाणार आहे, असे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
व्यवस्था परिवर्तन करायचे असेल तर सत्तेत गेले पाहिजे, म्हणून २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेडने पक्ष म्हणून नोंदणी केली. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड म्हणून पुढे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अध्यक्षांनी सांगितले. येणाऱ्या काळात आम्ही शिवसेनेसोबत सहभागी राहू, युती करतोय, असेही त्यांनी सांगितले.
मी आज नवीन युतीची घोषणा करत आहे. शिवसेना संभाजी ब्रिगेडच्या लढवय्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत आहे. देशात प्रादेशिक अस्मिता मारून टाकणे यालाच लोकशाही मानणारे लोक बेताल वागू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयावर आमचा लढा सुरु आहे, हा जो निकाल लागेल त्यावर शिवसेनेचे भविष्यच नव्हे तर देशात लोकशाही राहिल की नाही हे ठरविणारा निकाल असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेशी संबंधीत नाहीत त्या व्यक्ती संविधान वाचविण्यासाठी एकत्र येऊया असे सांगत आहेत. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवूया. दुहीच्या साप आमचा विश्वासघात करत आलाय, त्याला गाडू, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
ही युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाहीय, तसे असते तर आताच्या काळात आला नसता. सत्तेत असताना आला असता. महाराष्ट्रात जे काही घडवले गेले किंवा बिघडवले गेले ते बदलायचे आहे. सत्ते आम्ही येऊच पण देशाला मार्गदर्शक ठरेल असा महाराष्ट्र घडवू असे उद्धव ठाकरे म्हणाले.