Video:...तर आमच्या स्टाईलने आंदोलन करु; संभाजी ब्रिगेडने दिला मनसेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 06:08 PM2020-01-07T18:08:45+5:302020-01-07T18:11:53+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक 'राजमुद्रा' आहे.
मुंबई - राज्यातील सत्तासमीकरण बदलल्यानंतर मनसे नेमकी काय भूमिका घेणार यावरुन अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मनसेच्या झेंड्यात बदल करुन हा भगवा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र या भगव्या झेंड्यात राजमुद्रा असण्यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मनसेने छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा राजकारणासाठी वापरू नये अन्यथा आंदोलन करु असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २३ जानेवारी रोजी मुंबईत महाधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मात्र तत्पूर्वी मनसे हिंदुत्वाच्या दिशेने राजकारण करणार असून शिवसेनेपासून दुरावलेला कट्टर हिंदुत्ववादी मतदार खेचण्यासाठी राज ठाकरे आपली रणनीती बदलणार असल्याचं बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेच्या झेंड्यातील निळा आणि हिरवा रंग बदलून संपूर्ण झेंडा भगवा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काही वर्षापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवजयंती आणि महाराष्ट्र दिनासाठी भगव्या रंगाचा झेंड्याचं अनावरण केलं होतं. यावर शिवरायांची राजमुद्राही प्रकाशित करण्यात आली होती. मनसे कार्यकर्त्यांकडून हा झेंडा शिवजयंतीच्या कार्यक्रमात वापरण्यात येत होता. हाच झेंडा मनसेचा अधिकृत झेंडा म्हणून पुढे आणणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावरुन शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगडचे संतोष शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक 'राजमुद्रा' आहे. 'राजमुद्रा' ही महाराजांची प्रशासकीय बाब आहे. त्याचा राजकारणासाठी मनसे'सह कोणीही वापर करू नये, मनसेने मतांच्या राजकारणासाठी झेंडा आणला होता. त्यातून यश मिळालं नसल्याने झेंडा बदलणार असल्याचं कळतंय, पण त्यांनी वारकऱ्यांचा, हिंदू धर्माचा झेंडा म्हणून भगवा स्वीकारला तर त्यांचे स्वागत आहे. परंतु त्यावर शिवरायांची राजमुद्रा असू नये असं त्यांनी सांगितले आहे.
भगवा झेंडा हा समता आणि बंधुतेचा प्रतीक आहे. तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी संप्रदाय यांचे प्रतीक आहे. तेच त्यांनी स्वीकारावं, भगव्या झेंड्यात राजमुद्रा वापरून मनसेने राजकीय फायदा करण्याचा प्रयत्न करु नये, मात्र तरीही मनसेने राजमुद्रा असलेला झेंडा वापरला तर संभाजी ब्रिग्रेड त्याचा विरोध करेल. आणि आमच्या स्टाईलने आम्ही आंदोलन करु असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही'
बाळा नांदगावकरांचे 'मनसे' संकेत; भविष्यात कोणत्या राजकीय पक्षासोबत होऊ शकते युती?
महाविकास आघाडीत नाराज, कृष्णकुंजवर हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
'मनसे आमूलाग्र बदलणार, भूमिका अन् ध्येयधोरणांचंही 'नवनिर्माण''
मनसेच्या ध्वजाचा रंग बदलणार? पक्षाच्या वाटचालीबाबत राज ठाकरे मोठा निर्णय घेणार?