संभाजी देशमुखांच्या समाधीचा शोध

By admin | Published: February 27, 2017 02:49 AM2017-02-27T02:49:33+5:302017-02-27T02:49:33+5:30

सुधागड तालुक्यातील तिवरे गावांतील समाधी, तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ऐतिहासिक दस्तावेज व ग्रंथाच्या अभ्यासांती शोधून काढण्यात यश आले आहे.

Sambhaji Deshmukh's research on Samadhi | संभाजी देशमुखांच्या समाधीचा शोध

संभाजी देशमुखांच्या समाधीचा शोध

Next

जयंत धुळप,

अलिबाग- संभाजी राजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांच्या काळात, रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ल्यावरील मोघलांचे साम्राज्य गनिमीकाव्याने उलथवून टाकून, सुधागड मराठ्यांच्या ताब्यात घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पराक्रमी संभाजी हैबतराव देशमुख यांची सुधागड तालुक्यातील तिवरे गावांतील समाधी, तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ऐतिहासिक दस्तावेज व ग्रंथाच्या अभ्यासांती शोधून काढण्यात यश आले आहे. त्याबाबतचे अधिकृत पुरावे सादर करून ती समाधी पराक्रमी संभाजी हैबतराव देशमुख यांची असल्याचे सिद्ध करण्यात परळी(पाली) येथील इतिहास अभ्यासक व संशोधक संदीप मु.परब यांना यश आले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाने इतिहास संशोधक परब यांच्या या ऐतिहासिक संशोधनास नुकतेच प्रसिद्ध करून इतिहासप्रेमी व अभ्यासकांसमोर ठेवले आहे. भोर संस्थानचे पहिले अधिपती पंतसचिव शंकराजी नारायण यांच्या पदरी संभाजी हैबतराव देशमुख हे सरदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या पराक्रमाबाबत आणि समाधीच्या अस्तित्वाबाबत ७८ विविध ऐतिहासिक दस्तपुराव्या खातर उपलब्ध असल्याचे संदीप परब यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
संभाजी हैबतराव देशमुख यांनी किल्ले सुधागड हस्तगत करण्यासाठी केलेल्या पराक्रमासंदर्भातील पहिला उल्लेख अनंत नारायण भागवत यांनी लिहिलेल्या ‘भोर संस्थानचा इतिहास’ या ग्रंथात आढळतो. त्यामध्ये,‘सुधागड किल्ला चढून एकदम हल्ला करण्यास मार्ग नाही, असे पाहून त्यांच्या धारकऱ्यांनी तो युक्तीनेच छापा घालून घेण्याची खटपट केली आणि ती शेवटासही गेली. तेव्हा संभाजी हैबतराव, राघोजी गौळी, गणजी शिंदे न्हावी, रत्नोजी हुले, हिरोजी जाधव, जावजी चव्हाण, गंगाजी शिंदे वगैरे मुख्य धारकरी असून त्या सर्वांचा सरदार मालोजी भोसले नावाचा होता.
या कालखंडासंदर्भात ग्रंथकार अनंत भागवत यांनी कोणत्याही तारखेचा उल्लेख केलेला नसला तरी तो सुधागड या किल्ल्याशी निगडीत आहे. मात्र, संभाजी देशमुख यांना मिळालेल्या इनामपत्राच्या संदर्भातील नोंदीत याचा उल्लेख आहे. हा उल्लेख पोलादपूरच्या चित्रे दप्तरातून उपलब्ध झालेल्या पत्रानुसार, ‘ले-२३ , श १६१६ माग शु ९, पोलादपूर चित्रे श्री इ. १६९४ डिसें १५’ असा असल्याचा पुरावा उपलब्ध असल्याचे परब यांनी सांगितले. पंतसचिव शंकराजी नारायण यांच्या कडून संभाजी देशमुख यांना १६९४ मध्ये दिलेल्या इनामपत्रात सारे संदर्भ स्पष्ट होतात. यापत्रानुसार संभाजी देशमुख यांचे वास्तव्याचे ठिकाण असून कान्हिवली हा गाव त्यांना इनाम दिला होता, असे या पत्राच्याआधारे स्पष्ट होते.
>संभाजी हैबतराव देशमुख समाधी
सुधागड तालुक्यात मौजे तिवरे, येथे सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांची समाधी आहे. समाधीची एक बाजू मोडकळीस आली असून समाधीचा इतर भाग सुस्थितीत आहे. समाधीच्या चारही बाजूस १० इंचात कोरीव नक्षीकाम केलेले आहे. समाधीच्या मुख्य चौथऱ्याच्या मध्यभागी चौकोनात समाधी लेख कोरलेला आहे. या लेखात,‘संभाजीराव निरंतर बहिरजीराव शके. १७.२२’ असे नमूद करण्यात आले आहे.
>समाधी लेखाची चिकित्सा
डॉ. मो. गं. दीक्षित यांनी ‘मराठेशाहीतील शीलालेख’ या आपल्या ग्रंथात महाराष्ट्रातील शके १४९७पासून शके १८०० पर्यंतचे सुमारे १५२ शीलालेख संग्रहित करून ते लेख कोरण्याकरिता वापरण्यात येणारा दगड, लेखाची जागा, लेख कोरण्याची पद्धत, लेखाची भाषा व लिपी, लेखाचे लिखाण, लेखाचा मायना, लेखाचा कालख्ांड व व्यक्तिनाम या विविध अंगाने विस्तृत असे विवेचन केलेले आहे. याचा आधार घेऊन मौजे तिवरे, ता. सुधागड, जि. रायगड येथील सरदार संभाजी हैबतराव यांच्या समाधीवरील लेखाचे निरीक्षण केले असता ही समाधी संभाजी हैबतराव देशमुख यांचीच असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे परब यांनी संबंधित पुराव्यांसह सांगितले.

Web Title: Sambhaji Deshmukh's research on Samadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.