मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संभाजी महाराजही मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 11:02 AM2020-01-31T11:02:11+5:302020-01-31T11:17:40+5:30
मराठवाड्याचे दु:ख कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या पाण्यामुळे कमी होणार असेल आणि येथील शेतकरी समृद्ध होणार असेल तर मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देण्यास तयार असल्याची ग्वाही संभाजी राजे यांनी दिली.
मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यात पाण्याचे असलेले दुर्भिक्ष पाहता, विरोधीपक्षाने यावर गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी एकदिवसीय उपोषण केल्यानंतर आता राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे.
मराठवाड्याचे दु:ख कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या पाण्यामुळे कमी होणार असेल आणि येथील शेतकरी समृद्ध होणार असेल तर मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देण्यास तयार असल्याची ग्वाही संभाजी राजे यांनी दिली. तसेच मराठवाड्याच्या पाण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रित प्रयत्न करू अस आवाहन त्यांनी केले. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाड्याच्या दुष्काळावर काम होईल, अस चित्र आहे.
आधीच्या सरकारने मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण अशा मराठवाडा वॉटरग्रीड योजनेची घोषणा केली होती. मात्र नवीन सरकार ही योजना गुंडाळणार असं दिसत आहे. तांत्रिकदृष्ट्या ही योजना अयोग्य असल्याचे सांगत तज्ज्ञांकडून तपासल्यानंतरच योजनेला निधी देऊ अशी भूमिका मंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे या योजनेचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे.