संभाजीराजे भोसलेंना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला; कार्यकर्ते संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 09:50 PM2022-05-10T21:50:45+5:302022-05-10T21:51:07+5:30
मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी
उस्मानाबाद: तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीराजे भोसले यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर संभाजीराजेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून सुनावलं. या घटनेमुळे संभाजीराजे यांचा अपमान झाल्याचं म्हणत मराठा क्रांती ठोक मोर्चानं संताप व्यक्त केला. मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
संभाजीराजे भोसले काल तुळजापूरला तुळजा भवानीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. मात्र, त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला. संभाजीराजे देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जात असताना नियम सांगून त्यांना रोखण्यात आलं. यासंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. या घटनेवेळी मंदिरातून बाहेर पडताना संभाजीराजे भोसले यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
याबद्दल मराठा क्रांती ठोक मोर्चानं तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र पाठवलं आहे. 'संभाजीराजे भोसले तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले असता कुठलाही प्रोटोकॉल न पाळता त्यांना दर्शन घेण्यासाठी सहजनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी गाभाऱ्यात येण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज संभाजीराजे भोसले यांचा अवमान केल्याने छत्रपती प्रेमींचं मन दुखावलं आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं. अन्यथा दप्तर दिरंगाई कायद्यानुसार वाट पाहून बोंब मारो आंदोलन करण्यात येईल', असा इशारा मोर्चाकडून देण्यात आला आहे.