संभाजीराजे छत्रपती पुन्हा मैदानात! परिवर्तन क्रांतीची घोषणा; तुळजापूरहून होणार एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 12:17 PM2022-08-03T12:17:35+5:302022-08-03T12:18:45+5:30
भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला. यानंतर शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष वाढत जाताना पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना, आता संभाजीराजे छत्रपती आता पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तन क्रांतीची घोषणा केली असून, ०९ ऑगस्ट रोजी तुळजापूर येथून याला सुरुवात होणार आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या मुहूर्तावर आपल्या समर्थकांना तुळजापूरमध्ये जमण्याच आवाहन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये, क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात. भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. यानंतर आता संभाजीराजे छत्रपती नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
परिवर्तन क्रांतीची सुरुवात तुळजापूरहूनच का?
संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात तुळजापूरमधून करण्याला कारण आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगितले होते. यासोबतच स्वराज्य या संघटनेची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असेही संभाजीराजे म्हणाले होते. त्यामुळे संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर इथे नेमके काय केले जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.