"शिवरायांबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या कुविचारी कोरटकरवर…’’, संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:42 IST2025-02-25T17:40:49+5:302025-02-25T17:42:22+5:30

Sambhaji Raje Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या या कुविचारी कोरटकरवर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

Sambhaji Raje Chhatrapati Criticize Dr. Prashant Koratkar, demanded strict action against Him | "शिवरायांबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या कुविचारी कोरटकरवर…’’, संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया  

"शिवरायांबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या कुविचारी कोरटकरवर…’’, संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया  

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याइतिहासाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यातच या चित्रपटातून करण्यात आलेल्या काही दाव्यांवरून वादांनाही तोंड फुटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील इतिहासकार इंद्रजित सावंत यांना डॉ. प्रशांत कोरटकर या व्यक्तीने फोन करून दिलेली धमकी आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेले अनुद्गार यामुळे संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणावर आता कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या या कुविचारी कोरटकरवर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

यासंदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विषवल्ली या राज्यात राहते, हीच बाब धक्कादायक आहे. सामाजिक दरी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अशा माथेफिरू लोकांना कुणीही पाठीशी घालू नये. देशाची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या या कुविचारी कोरटकरवर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करत अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

दरम्यान, प्रशांत कोरटकर यांनी फोनवरून दिलेल्या धमकीबाबत इंद्रजित सावंत यांनी एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, "मा.मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण  धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहित पण या हरामखोरांचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत,यांच्या पोटात श्री शिव छत्रपतीं बद्दल काय विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकार्डिंग व्हायरल करत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापाला ही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही", असे इंद्रजीत सावंत म्हणाले होते.

तर आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना  प्रशांत कोरटकर यांनी सांगितले होते ती,  "मला सकाळी कॉल आले की, माझ्या आवाजात कुणीतरी सावंत यांना धमकी दिली आहे. पहिली गोष्ट तर २५ वर्षांपासून पत्रकारिता करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असो, इतिहास असो याचा मी अभ्यास केलेला आहे. यापूर्वी इतकी जबाबदार पत्रकारिता केल्यानंतर असं मी कुणाला फोनवर धमकी देईल?", असे प्रशांत कोरटकर म्हणाले. 

"माझं नाव वापरून कुणीतरी फोन केला. अशा प्रकारची धमकी देण्याचा प्रश्नच नाहीये. बाष्कळ धमकी देण्याचा माझा पायंडा नाही. त्यांनी ती गोष्ट माझ्याशी शहानिशा करून टाकली असती, तर बरं झालं असतं. तुम्हाला माहितीये की हल्ली एआय करून आवाजाचे मार्फिंग केले जाते. माझ्याबद्दल द्वेष बाळगणाऱ्याने हा केलेला प्रकार आहे. मी पोलिसांत तक्रार आहे की, कोणी माझ्या आवाजाची नक्कल केली आहे", असा दावाही प्रशांत कोरटकर यांनी केला होता. 

Web Title: Sambhaji Raje Chhatrapati Criticize Dr. Prashant Koratkar, demanded strict action against Him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.