महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला तर गाठ माझ्याशी आहे; संभाजीराजे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 04:46 PM2022-11-06T16:46:26+5:302022-11-06T16:48:22+5:30
शिवरायांवर आधारित चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप संभीजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
मुंबई: गेल्या काही वर्षांपासून मराठीत छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक ऐतिहासिक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांमध्ये अनेकदा इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करण्यात आलाय. याच मुद्द्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. आज पत्रकार परिषद घेऊन चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना चांगलाच दम दिला.
...तर गाठ माझ्याशी आहे
यावेळी संभाजीराजे महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' आणि सुबोध भावे अभिनीत 'हर हर महादेव' चित्रपटावर चांगलेच संतापले. 'हे काय मावळे आहेत, यांच्या डोक्यावर पगडतरी आहे का? पगडी काढणे म्हणजे शोक संदेश असतो. हे असे मावळे असतात का? ड्रामेटायझेशन दाखवण्याच्या नावाखाली काहीही करणार का? असे चित्रपट काढणार असाल तर सरकारने सेंसॉरवर ऐतिहासिक समिती स्थापन करावी. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला तर गाठ माझ्याशी आहे,' असा इशारा संभाजीराजेंनी यावेळी दिला.
मी त्यांना आडवा जाणार
ते पुढे म्हणाले, 'आपण सर्वजण मराठे आहोत. त्या काळात मराठा जात नव्हती. मराठा म्हणजे सर्व मराठी माणसं. चित्रपटात काहीही दाखवले जात आहे. माझी सर्वांना विनंती आहे, महाराजांचा इतिहास वाचावा. माझा छत्रपतींच्या घराण्यात जन्म झाला आहे, ही माझी जबाबदारी आहे. छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड केली, तर खपवून घेणार नाही. मी तो हर हर महादेव चित्रपट पाहिला नाही. पण, माझ्याकडे रिपोर्ट आली, त्यात इतिहासाची मोडतोड केली आहे. अशाप्रकारचे चित्रपट पुन्हा समोर आले, तर मी त्यांना आडवा जाणार.
चांगला चित्रपट काढा, शाबसकी देईन
संभाजीराजे पुढे म्हणतात की, 'मी कोणालाही धमकी देत नाहीये. मी यापूर्वी कोणाला बोललो नाही, पण आता बोललोय. या घराण्यात माझा जन्म झाला, त्यामुळे यापुढे असे चित्रपट काढू देणार नाही. लोकांना विनंती आहे की, त्यांनी असे चित्रपट पाहू नये. मी सेंसॉर बोर्डालाही पत्र देणार आहे. इतिहासाची मोडतोड होत असताना, सेंसॉर बोर्डाने परवानगी दिलीच कशी, हे मी विचारणार आहे. चांगला चित्रपट काढला, तर मी स्वतः त्यांना शाबासकी देईल,' असेही ते म्हणाले.