पन्हाळा गड संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना करा, संभाजीराजे छत्रपतींकडून मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 03:03 PM2022-07-13T15:03:46+5:302022-07-13T15:05:54+5:30
Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली आहे.
कोल्हापूर : पन्हाळा गडाची तटबंदी काही बुरुज ढासळले असून,अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत. त्यामुळे पन्हाळगडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनबाबत शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. किल्ल्याची तटबंदी काही बुरुज ढासळले असून,अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत. संततधार पावसाने पन्हाळा किल्ल्याच्या चार दरवाजाला लागून असलेल्या ऐतिहासिक भिंतीचा काही भाग सायंकाळी कोसळला आहे. मागीलवर्षीही याच जागेजवळ भिंतीचा काही भाग कोसळला होता, मात्र निधीअभावी दुरुस्तीची कामे झाली नाहीत.
संभाजीराजे छत्रपतींनी काय म्हटले आहे पत्रात?
कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या काही वर्षांपासून महापुराचा सामना करावा लागत आहे, या संततधार पावसामुळे पन्हाळा किल्ल्याचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले असून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थही दिवस रात्र भीतीच्या छायेत जगत आहेत. बुरुज आणि तटबंदी कोसळल्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावात मोठमोठे दगड आणि पाण्याचे लोट येत आहेत. दुर्दैवाने काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे असे चित्र दिसते.
अशातच पन्हाळ्याला केंद्रीय पुरात्तव खात्याचा पूर्ण वेळ प्रभारी अधिकारी नसल्याने राज्य शासनाची ही जबाबदारी ठरते. वेळीच किल्ल्याची डागडुजी व संवर्धन केलं नाही, तर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेला ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पन्हाळगडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासन व नगरपालिकेबाबत शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आपण यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राद्वारे केली आहे.