Maratha Reservation: “शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे”: संभाजीराजेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 05:24 PM2022-08-09T17:24:33+5:302022-08-09T17:26:16+5:30
Maratha Reservation: यापूर्वीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही. आता शिंदे-फडणवीसांनी यात लक्ष घालावे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, यातील काही जणांच्या शपथविधीवरून महाविकास आघाडीतील नेत्यांसह अन्य नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. यातच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केले.
महाविकास आघाडी सरकारने सरकार स्थापन करण्यासाठी ३० दिवस घेतले होते. आता या नव्या सरकारने ३५ ते ४० दिवस घेतले त्यामुळे एकूण ६० ते ६५ दिवस असेच गेले. असो काही हरकत नाही जे जनतेच्या सेवेसाठीचे वाया गेलेले दिवस आहेत ते भरून काढावेत आणि चांगले जोमाने काम करावे. महाराष्ट्रात अनेक ज्वलंत विषय आहेत प्रश्न आहेत ते सोडवणे गरजेचे होते मात्र असो उशीर झाला तरी त्यांना आमच्या शुभेच्छा, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही
यापूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही. मी आमरण उपोषण केल्यानंतर एकनाथ शिंदेदेखील त्यावेळी आले होते तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते मात्र आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले त्या दोघांनी लक्ष घालावे आणि मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यावर जे आरोप आहेत मात्र त्यांना मंत्रिमंडळात घेतले असेल तर त्याबाबत मुख्यमंत्रीच त्याचे उत्तर देतील. मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रवक्ते आहेत ते यावर उत्तर देतील, असे सांगत संभाजीराजे यांनी याविषयावर अधिक बोलणे टाळले.