Maharashtra Politics: “राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा, PM मोदींना हात जोडून विनंती करतो”; संभाजीराजे संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 04:49 PM2022-11-19T16:49:29+5:302022-11-19T16:50:39+5:30
Maharashtra News: यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसे? अशी संतप्त विचारणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती करतो, असे खडे बोल संभाजीराजेंनी सुनावले आहेत.
आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून संभाजीराजेंनी तीव्र शब्दांत भाष्य केले आहे.
राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा
राज्यपाल असे का बडतात मला माहिती नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असे मी परवा सुद्धा म्हटले होते. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? महाराष्ट्राचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसे शकते. यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसे? अशी संतप्त विचारणा संभाजीराजे यांनी केली आहे.
दरम्यान, लेखक आणि इतिहास तज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. राज्यपाल हे नेहमी संदर्भहिन बोलतात, वादग्रस्त बोलतात आणि अपमानजनक बोलतात. राज्यपाल पदाची प्रतिष्ठा गमावलेली व्यक्ती म्हणजे कोश्यारी. शरद पवार आणि नितीन गडकरी कर्तृत्ववान आहेतच. त्याच्याबद्दल आदर आहेच. पण राजपालांनी महाराजांचा उपमर्द केला, असे श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"