Sambhaji Raje Chhatrapati: “व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी, विरोधक राजकारण करत आहेत”; संभाजीराजे संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 09:54 AM2023-04-06T09:54:37+5:302023-04-06T09:55:20+5:30
Sambhaji Raje Chhatrapati: महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना केली, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
Sambhaji Raje Chhatrapati: राज्यातील राजकारणात विरोधक महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप व शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी राजकारणी सोडताना दिसत नाहीत. यातच ठाण्यातील घटनेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. यातच आता स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी, विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्रासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा असताना व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत, हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी आम्ही स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे, असे संभाजीराजे यांनी नमूद केले. तसेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर टीका करताना वापरलेल्या भाषेवरूनही संभाजीराजे यांनी कानपिचक्या दिल्या.
विकासाच्या मुद्द्यावर बोलले तरच सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल
व्यक्तीद्वेष ठेवून कुणीही राजकारण करु नये. व्यक्तीद्वेष ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खरेतर विकासाचे ध्येय समोर ठेवून राजकारण केले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर बोलले तरच सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल. सत्तेवर असलेल्यांनी किंवा नसलेल्यांनी व्यक्तीद्वेष सोडून विकासाच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे. लोकांना काहीतरी आवडते म्हणून काहीही बोलणे हे टाळले पाहिजे, असे स्पष्ट मत संभाजीराजे छत्रपती यांनी मांडले.
दरम्यान, आताच्या घडीला महाराष्ट्र किती अडचणीत आहे, हेही बघितले पाहिजे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा असताना व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत. हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी आम्ही स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे, असे संभाजीराजेंनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"