शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा
By संदीप आडनाईक | Updated: December 5, 2024 16:08 IST2024-12-05T16:05:09+5:302024-12-05T16:08:53+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसंदर्भातील शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र छापलेले ...

शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसंदर्भातील शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र छापलेले नाही, हे दुर्देवी आहे, ही चूक राज्य सरकारने तत्काळ दुरुस्त करावी अशी मागणी स्वराज पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी केली आहे.
राज्य सरकारने शपथविथीच्या जाहिरातीत इतर महापुरुषांची छायाचित्रे प्रसिध्द केली. मात्र, शाहू महाराजांचे छायाचित्र छापले नाही हे चुकीचे आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही, महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. सरकारने ही चूक दुरुस्त करावी, असा इशारा स्वराज पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
भाजपने गुरुवारी राज्यातील विविध वृत्तपत्रात शपथविधी सोहळ्यासाठी जी जाहिरात प्रसिध्दीस दिली आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे छायाचित्र आहे, मात्र महाराष्ट्रात आरक्षणाचा दूरदृष्टीचा पहिला निर्णय घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यात स्थान दिलेलं नाही. याविरोधात सोशल मीडियासह सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी भाजपने सर्वच प्रमुख वृत्तपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार या भाजपच्या नेत्यांचीही छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत, मात्र, त्यातही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही छायाचित्र वगळलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला परंतु शपथविधी सोहळा पार पडत असताना त्यांचा विसर भाजपला पडल्याने ही जाहिरात टीकेचा विषय ठरत आहे.
कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती यांनी यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, देवेंद्र फडणवीस यांनी आता पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्राला सुपर पॉवर कसे बनवता येईल याकडे लक्ष द्यावे. केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, त्यामुळे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याला प्राधान्य द्यावे.