PM मोदींची शिवरायांशी तुलना? गोविंददेव गिरींच्या वक्तव्यावर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 02:55 PM2024-01-23T14:55:28+5:302024-01-23T15:00:40+5:30
Sambhaji Raje News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सुटेल, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.
Sambhaji Raje News: रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. रामललांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. या सोहळ्यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढत पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. यावरून आता प्रतिक्रिया येत असून, संभाजीराजे छत्रपती यांनी यावर भाष्य केले आहे.
एखादे परिवर्तन आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पावे लागते. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभली. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. मला राज्य करायचे नाही, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आले. पण ज्येष्ठ मंत्र्यांनी महाराजांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले. समर्थ रामदास स्वामी यांचीही यावेळी आठवण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गौरवोद्गार काढताना समर्थ रामदास स्वामी म्हणाले होते की, निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी. आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटले होते. मीडियाशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
नेमके काय म्हणाले संभाजीराजे?
संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गोविंद देवगिरी महाराज काय म्हणालेत, हे मी ऐकले नाही. त्यामुळे यावर ठोस बोलणे उचित होणार नाही, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. तसेच मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचे ठरवले आहे हे आनंदाचे आहे. आरक्षण मिळवायचे असेल तर सर्व्हेक्षण करावे लागणार ही मागणी करत होतो. मात्र आता इतक्या वर्षांनी सरकारने सुरू केले हे आनंदाचे आहे. आता सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्यायला हवी, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
दरम्यान, कुणालाही खुश करण्यासाठी शॉर्टकट वापरू नका, नाहीतर पुन्हा कोर्टात हे टिकणार नाही. आठ दिवसात करतो, १० दिवसात करतो यापेक्षा परिपूर्ण सर्व्हेक्षण व्हावे. मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आरक्षणासाठी लढत आहेत. कुणबी प्रमाणपत्र सर्वांनाच मिळणार नाही, त्यामुळे मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळावे, यासाठी व्यवस्था केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले तर हा प्रश्न तातडीने सुटेल. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली हे मुख्यमंत्र्यांनी धाडस केले, पण आरक्षण कसे देणार हे सांगावे. मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको, असे संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.