Sambhaji Raje Chhatrapati: राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचं राज्यातील आमदारांना खुलं पत्र, केलं भावूक आवाहन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 06:53 PM2022-05-17T18:53:21+5:302022-05-17T19:09:26+5:30

Sambhaji Raje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व विधानसभा आमदारांना एक भावूक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी या आमदारांना सूचक आवाहन केलं आहे.

Sambhaji Raje's open letter to Rajya Sabha MLAs regarding Rajya Sabha candidature, made a passionate appeal, said ... | Sambhaji Raje Chhatrapati: राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचं राज्यातील आमदारांना खुलं पत्र, केलं भावूक आवाहन, म्हणाले...

Sambhaji Raje Chhatrapati: राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचं राज्यातील आमदारांना खुलं पत्र, केलं भावूक आवाहन, म्हणाले...

Next

मुंबई - पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यातच शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची घोषणा केली असतानाच शिवसेनेने दुसरा उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व विधानसभा आमदारांना एक भावूक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी या आमदारांना सूचक आवाहन केलं आहे.

या पत्रामध्ये संभाजीराजे छत्रपती लिहितात की, आपणांस कल्पना आहेच की, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. 

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केलेले आहे.

२००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदाकीच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले. याचमुळे, राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो, असं आवाहनही संभाजीराजेंनी पत्राच्या शेवटी केलं आहे. 

Web Title: Sambhaji Raje's open letter to Rajya Sabha MLAs regarding Rajya Sabha candidature, made a passionate appeal, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.