मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावेत, संभाजीराजेंची राज्यपालांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 10:04 PM2020-08-16T22:04:55+5:302020-08-16T22:11:25+5:30
दरवर्षी मंत्रिमंडळ कॅबिनेटची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती संभाजीराजे यांनी राज्यपालांना केली आहे.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी किल्ले शिवनेरीला भेट दिली. यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी पायी गड सर केला. याबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांचे कौतुक केले आहे. तसेच, दरवर्षी मंत्रिमंडळ कॅबिनेटची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती संभाजीराजे यांनी राज्यपालांना केली आहे.
यासंदर्भात संभाजीराजे यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "राज्यपालांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी 'पायी' सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले, त्याचे मी मनापासून स्वागत करतो."
राज्यपालांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी 'पायी' सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो. pic.twitter.com/76hkxSAlPp
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 16, 2020
याचबरोबर, "राज्यपाल महोदयांना माझी अजून एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी कॅबिनेटची एक बैठक रायगडवर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या धेयवादाने रायगडवर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल." असे संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. याशिवाय, स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.
राज्यपाल महोदयांना माझी अजून एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी कॅबिनेट ची एक बैठक रायगड वर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या धेयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 16, 2020
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी किल्ले शिवनेरीला भेट दिली. भगतसिंह कोश्यारी यांनी पायी गड सर केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. कोश्यारी म्हणाले, की राज्यात आणि देशात शिवरायांचे उत्तराधिकारी म्हणून अनेक जण मिरवत असतात. मात्र, त्यांचे विचार आत्मसात करताना घाबरतात. अशा लोकांनी स्वत:ला उत्तराधिकारी म्हणून घेऊ नये, असे सांगत नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला.
स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 16, 2020
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मंत्र्याला एक किल्ला दत्तक दिला पाहिजे. असे झाले तरच राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन होईल, असे कोश्यारी म्हणाले. राज्यपालांचे वय लक्षात घेता प्रशासनाने त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था केली होती. परंतु त्यांनी कोठेही न थांबता, भर पावसात छत्री तसेच रेनकोट न घेता तरुणांना लाजवेल अशा जोशात शिवनेरी सर केला.
कोरोना प्रतिबंधक काळात विशेष परवानगी म्हणून राज्यपालांच्या भेटीसाठी किल्ले शिवनेरी खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले होते.