आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच; संभाजीराजे छत्रपती धनंजय मुंडेंवर संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:36 IST2025-03-04T16:35:29+5:302025-03-04T16:36:16+5:30

राज्यातील जनतेच्या आक्रोशासमोर झुकत आज धनंजय मुंडे यांनी आजारपणाचं कारण पुढे करत मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला.

Sambhajiraje Chhatrapati anger on Dhananjay Munde over sarpanch santosh deshmukh murder case | आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच; संभाजीराजे छत्रपती धनंजय मुंडेंवर संतापले!

आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच; संभाजीराजे छत्रपती धनंजय मुंडेंवर संतापले!

Sambhaji Raje Chhatrapati: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तपासाअंती सीआयडीने नुकतेच कोर्टात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं. ज्या धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्यात आपली सर्व राजकीय शक्ती कराडसारख्या क्रूर व्यक्तीच्या पाठीशी उभी केली होती त्या मुंडेंना मंत्रि‍पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा भावना राज्यभर व्यक्त केल्या गेल्या. जनतेच्या आक्रोशासमोर झुकत आज धनंजय मुंडे यांनी आजारपणाचं कारण पुढे करत मंत्रि‍पदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं. मुंडे यांच्या या कृतीनंतर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक शब्दांत आपल्या भावना मांडल्या आहेत.

"संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे. या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहीरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रिपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती. मात्र लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले. राजीनाम्याच्या मागणीकडेही अडीच महिने दुर्लक्ष केले गेले. किंचितही नैतिकता असती तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता," अशा शब्दांत संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, "मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे," असा हल्लाबोलही संभाजीराजे यांनी धनंजय मुंडेंवर केला आहे.

राजीनाम्याची माहिती देताना काय म्हणाले धनंजय मुंडे?

"बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे," अशी माहिती धनंजय मुंडे यांनी आज सकाळी दिली.

Web Title: Sambhajiraje Chhatrapati anger on Dhananjay Munde over sarpanch santosh deshmukh murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.