शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप; पक्षप्रवेश निश्चित?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:21 PM2022-05-22T17:21:13+5:302022-05-22T17:22:20+5:30
राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा आता सुटणार आहे. कारण संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित मानला जात आहे.
मुंबई-
राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा आता सुटणार आहे. कारण संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. तसा निरोपच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संभाजीराजे छत्रपतींना पाठवण्यात आला आहे. उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या असा संदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकरवी संभाजीराजे छत्रपतींना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना नेत्यांमध्ये हॉटेल ट्रायडंटमध्ये आज महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर तासाभरातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजेंना फोनकरुन उद्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी येण्याचा निरोप दिला आहे. राज्यसभेत जायचं असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट शिवसेनेकडून घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचं शिष्टमंडळ आणि संभाजीराजे छत्रपतींमध्ये आज विशेष बैठक झाली. शिवसेनेच्या शिष्टमंडळात अनिल देसाई, उदय सामंत, मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. तब्बल पाऊणतास संभाजीराजेंसोबत या बैठकीत चर्चा झाली. याआधीही संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेत प्रवेशाची अट संभाजीराजेंना घातली होती. त्यावेळी संभाजीराजेंनी मला शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा उमेदवार घोषीत करा अशी भूमिका घेतली होती. मात्र आता संभाजीराजेंनी शिवसेना पक्षप्रवेश करावा, हाती शिवबंधन बांधावं असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे यांना दिला आहे. यामुळे आता संभाजीराजे कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.