“छत्रपती शिवरायांना त्रास दिला, त्याचं कौतुक कुणी कसं करू शकतं?”; संभाजीराजे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 04:16 PM2023-06-25T16:16:07+5:302023-06-25T16:16:50+5:30
भावी मुख्यमंत्री म्हणून संभाजीराजे यांच्या नावाचा बॅनर लावण्यात आला. यावर, संभाजीराजेंची सूचक प्रतिक्रिया दिली.
Sambhajiraje Chhatrapati: राज्यात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. यातच आता औरंगजेबच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. MIM च्या कार्यक्रमात औरंगजेबच्या नावाच्या घोषणा दिल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी या घडामोडींवर भाष्य करताना संताप व्यक्त केला.
मलकापूर येथील जाहीर सभेत नारेबाजी करण्यात आली. मी जे नाही बोललो ते प्रसारीत करण्यात आले, असा आक्षेप खासदार एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असुद्दीन ओवेसी यांनी घेतला. खोट्या बातम्या चालवू नका, किती खोट्या बातम्या चालविणार, मुस्लिमांचा तुम्ही किती द्वेष करणार, अशी टीका त्यांनी केली. तुम्ही खोट्या बातम्या चालविल्या तर मी गुन्हे दाखल करणार, अशी तंबी खासदार ओवेसी यांनी दिली. यानंतर आता यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
छत्रपती शिवरायांना त्रास दिला, त्याचे कौतुक कुणी कसे करू शकते?
कसे काय कुणी औरंगजेबचे नाव घेऊ शकते? छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या माणसाने त्रास दिला. छत्रपती संभाजीराजे यांना त्रास दिला. त्याचे कुणी कसे कौतुक करू शकते?, अशी संतप्त विचारणा संभाजीराजे यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीची पाहणी केली. तिथे माथा टेकला. यावर बोलताना, हे दुर्दैव आहे. हे काही महाराष्ट्राचे संस्कार नाही. तुम्हाला जर अभिवादन करायचं असेल, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समधीला जाऊन अभिवादन करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन अभिवादन केले होते, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भावी मुख्यमंत्री म्हणत संभाजीराजे यांच्या नावाचा बॅनर लावण्यात आला. त्यावर बोलताना, मी काही हे पोस्टर लावलेले नाहीत. माझ्या मनात काही नाही. फक्त प्रामाणिकपणे काम करत राहणे हे माझे ध्येय आहे. ते मी करतो आहे, असे संभाजीराजे म्हणाले.