संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 09:32 PM2022-06-24T21:32:27+5:302022-06-24T21:33:36+5:30
राज्यातील राजकीय परिस्थितीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
नाशिक: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य करताना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला सुनावले आहे.
महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. पाऊस पडतो की नाही? याकडे लक्ष आहे. यामुळे आपण सर्वांनी या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीय केले पाहिजे. यासाठी आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे. समाजापर्यंत अधिकाधिक पोहोचण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
जे कुठलेही सरकार असेल ते लवकरात लवकर येऊ द्या
एकनाथ शिंदेंची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. यावर आपल्याला काही बोलायचे नाही, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत पुरस्कृत उमेदवार केले असते तर अशी वेळ आली नसती, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते. त्यावर त्यांनी बोलणे टाळले. तसेच जे कुठलेही सरकार असेल ते लवकरात लवकर येऊ द्या. सामान्य जनतेचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवावेत, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यकर्त्यांना थेट सुनावले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चौथ्या दिवशीही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा संबोधित केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले. तर दुसरीकडे, बंडखोर आमदारांमधील काहींना पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्विट, व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली.