उदयनराजे भोसलेंच्या पाठिशी संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:46 AM2017-07-24T00:46:55+5:302017-07-24T00:46:55+5:30
उदयनराजे भोसलेंच्यापाठिशी संभाजीराजे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : खंडणी प्रकरणात खासदार उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता असताना कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे हे उदयनराजेंच्या पाठिशी उभे राहिलेत. त्यांनी उदयनराजेंच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट लिहिलीय.
या पोस्टमध्ये संभाजीराजेंनी म्हटले आहे की, "काल रात्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी माझी चर्चा झाली.ज्या अडचणीचा ते सामना करत आहेत त्या अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे पुर्णपणे त्यांच्यासोबत आहे. कुठल्याही संकटाचा सामना कसा करायचा हे छत्रपती घराण्याला चांगले माहित आहे. संकट ही आम्हाला नवीन नाहीत.लवकरच ते यामधून बाहेर येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे." याआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस खासदार राजीव सातव यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिलाय.
उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष
खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले खासदार उदयनराजे भोसले हे सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार की, स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होणार याकडे तमाम सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
कृतीदल सतर्क !
उदयनराजे साताऱ्यात येऊन गेल्यानंतर जलद कृती दलाची तुकडी सतर्क झाली आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने मुख्यालयात राखीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उदयनराजे पुण्यात असले तरी त्यांच्यावर साताऱ्यातील गोपनीय विभाग त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे.