यंदाची सीईटी ठरल्याप्रमाणेच
By admin | Published: April 13, 2016 02:05 AM2016-04-13T02:05:19+5:302016-04-13T02:05:19+5:30
एमबीबीएस, बीडीएस आणि अन्य पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी यावर्षी ठरल्याप्रमाणेच राज्य सरकारची एमएचसीईटी घेतली जाणार आहे. ही परीक्षा आधी ठरल्यानुसार
मुंबई : एमबीबीएस, बीडीएस आणि अन्य पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी यावर्षी ठरल्याप्रमाणेच राज्य सरकारची एमएचसीईटी घेतली जाणार आहे. ही परीक्षा आधी ठरल्यानुसार ५ मे रोजीच होईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. देशातील सर्व सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी देशभरात ‘नीट’ ही एकच सामाईक परीक्षा घेण्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी पुढील वर्षापासून होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत मागे पडू नये म्हणून अकरावी बारावीचा अभ्यास अपग्रेड करण्यात येईल, अशीही ग्वाही तावडे यांनी यावेळी दिली.
बारावीची सीईटी परीक्षा तोंडावर आली असतना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निणर्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सर्व राज्यांमध्ये स्वतंत्र सीईटी घेण्याची तयारी झालेली असताना देशभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबतचा मुद्दा अनिल सोले यांनी उपस्थित करत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी केली होती.
त्यावर तावडे म्हणाले, ‘नीट’ ही परीक्षा घ्यायला सुरुवात केल्यापासून या परीक्षेच्या तयारीसाठी राज्यात मोठमोठ्या क्लासेसचे पेव फुटले. तीन ते पाच लाखापर्यंत फी हे क्लास चालक विद्यार्थ्यांकडून उकळू लागले. त्यामुळे ही सीईटी बंद करून राज्यांची वेगळी सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या
परीक्षेशी संबंधित सर्व अधिकारी, खात्यांचे मंत्री यांची बैठक घेण्यात आली. त्यानुसार ५ मे च्या परीक्षेचे वेळापत्रक न बदलता ही परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिली. मात्र पुढील वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निणर्यानुसारच ‘नीट’ घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी अभ्यास अपग्रेड करणार
‘नीट’ पुढील वर्षी होणार असली तरी तोपर्यंत आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम अपग्रेड करण्यात येईल, अशीही ग्वाही तावडे यांनी दिली. तर सीबीएससी, आयसीएससी च्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत म्हणून वेळ पडल्यास आठवी किवा सहावीपासूनच अभ्यासक्रम अपग्रेड करू, अशीही ग्वाही दिली.