समीर भुजबळ यांना अटक

By admin | Published: February 2, 2016 04:21 AM2016-02-02T04:21:29+5:302016-02-02T04:21:29+5:30

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तब्बल सहा तासांच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी रात्री अटक केली असून

Sameer Bhujbal arrested | समीर भुजबळ यांना अटक

समीर भुजबळ यांना अटक

Next

मुंबई : बेहिशेबी मालमत्ता (मनी लाँड्रिंग) प्रकरणी तब्बल सहा तासांच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री अटक केली असून, त्यांना उद्या, मंगळवारी कोर्टात हजर केले जाणार आहे, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सरकारी कंत्राटे मंजूर झालेल्या कंपन्यांकडून समीर आणि छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज हे ज्या काही कंपन्यांचे संचालक होते त्यांना लाच मिळाली असल्याचा आरोप आहे. या प्रकरणांत ईडीने १७ जून २०१५ रोजी महाराष्ट्र सदन आणि सेंट्रल लायब्ररी प्रकरणात एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट तयार केला होता. महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी ईडीने भुजबळ यांच्याविरोधात यापूर्वीच दोन एफआयआर दाखल केले आहेत. महाराष्ट्र सदन बांधकाम आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी कुठपर्यंत आली आहे, याचा ताजा रिपोर्ट सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २८ जानेवारी रोजी ईडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिला होता. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली. समीर यांच्या निश इन्फ्रास्ट्रक्चर, ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर आणि इदीन फर्निचर या कंपन्यांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली. समीर आणि पंकज भुजबळ हे निश आणि ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक होते तर समीरची पत्नी शेफाली आणि पंकजची पत्नी विशाखा या ईदीन फर्निचरच्या संचालक होत्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ईडीने भुजबळांच्या मालकीचा वांद्र्यातील रिकामा प्लॉट आणि सांताक्रुज येथील नऊ मजली इमारत हस्तगत केली होती. वांद्रे (पश्चिम) येथील सेंट मोनिका स्ट्रीटवरील या रिकाम्या भूखंडांवर हबीब मॅनोर व सॉलिटेअर या नावाने नऊ मजली इमारत (किमत ११० कोटी रुपये) उभ्या होत्या. या दोन्ही मालमत्ता ईडीने जप्त केल्या. त्याआधी ईडीकडे नोंदल्या गेलेल्या आणखी एका प्रकरणात ईडीने खारघरमधील हेक्स वर्ल्ड ही १६० कोटी रुपये किमतीची जमीनही ताब्यात घेतली होती. ईडीच्या कार्यालयात समीर यांच्यासोबत त्यांचे वकील अ‍ॅड. सजल यादव हेही गेले होते. मात्र चौकशीदरम्यान त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही. ईडीला छाप्यात काहीही आढळून आलेले नाही, असे पंचनाम्यावरून स्पष्ट होते, असे अ‍ॅड. यादव यांनी सांगितले. महाराष्ट्र सदन आणि सेंट्रल कालिना विद्यापीठ प्रकरणात छगन भुजबळ हे आरोपी असले तरी हेक्स वर्ल्ड प्रकरणात मात्र त्यांचे नाव नाही. याआधी चमणकर एंटरप्रायजेसच्या मालकीची १७.३५ कोटींची मालमत्ता हस्तगत केली होती.
> समीर भुजबळ यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी बेलार्ड इस्टेट येथील कार्यालयात दिवसभर चौकशी केली. मात्र चौकशीत समीर यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करणे अपरिहार्य होते, असे वृत्त ईडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने देण्यात आले आहे.
ईडीने छापे घातले, तेव्हा छगन भुजबळ मुंबईत नव्हते. ते आजच पहाटे अमेरिकेला रवाना झाले. अमेरिकन काँग्रेसच्या निमंत्रणावरून ते तिथे गेले असून, सामाजिक न्याय आणि शैक्षणिक सहकार्य व संवाद या विषयावर तिथे संबंधित सदस्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.
नऊ ठिकाणी छापे : छगन भुजबळ यांच्याशी संबंधित ९ मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी सोमवारी छापे घातले. छापे घतलेल्या नऊ ठिकाणांमध्ये वांद्र्यातील मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे कार्यालय, वरळीतील सुखदा सोसायटीतील भुजबळांचे अपार्टमेंट आणि सांताक्रुज येथील सॉलिटेअर बिल्डिंगचा समावेश आहे. एकट्या मुंबईत आम्ही नऊ ठिकाणी छापे टाकल्याचे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सूडबुद्धीने कारवाई - मलिक : सरकार भुजबळ यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करत असून ईडी, एटीएससारख्या संस्थांचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई कशी होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Sameer Bhujbal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.