मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात समीर भुजबळांना हायकोर्टाकडून जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 05:14 PM2018-06-06T17:14:12+5:302018-06-06T17:14:12+5:30
गेल्याच महिन्यात छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला होता
मुंबई: मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांना जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं समीर भुजबळांना जामीन मंजूर केला आहे. गेल्याच महिन्यात मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला होता. यानंतर आता दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित घोटाळा आणि कंत्राटांच्या बदल्यात काळ्या पैशांची कमाई केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या समीर भुजबळांनाही जामीन मिळाला आहे.
'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट' (पीएमएलए) या कायद्यातील कलम ४५विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा लाभ समीर यांना मिळू शकत नाही, असे म्हणत सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मंगळवारी समीर यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला होता. विविध कायदेशीर मुद्यांवरील त्यांचा युक्तिवाद मंगळवारी पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे न्या. अजय गडकरी यांनी आज दुपारी ३ वाजता पुढील सुनावणी ठेवली होती. सिंग यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्तींनी निकाल सुनावला आणि समीर भुजबळांना जामीन मिळाला. यापूर्वी याच गुन्ह्यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जवळपास सव्वा दोन वर्षांनंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांनी जामीन मंजूर केला होता.