समीर गायकवाडच्या कोठडीत वाढ
By admin | Published: November 8, 2015 12:25 AM2015-11-08T00:25:30+5:302015-11-08T00:25:30+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२) याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १५ दिवसांची
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२) याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १५ दिवसांची वाढ करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुनीलजित पाटील यांनी हे आदेश शनिवारी दिले. ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार होती, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे न्यायालय व कारागृह प्रशासनाचा संवाद होऊ न शकल्याने न्यायालयातच समीरच्या गैरहजेरीत सुनावणी झाली.
समीर सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. शुक्रवारी समीरच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्याची दाट शक्यता होती. पुरेसा पोलीस फौजफाटा उपलब्ध नसल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याचा निर्णय झाला. साडेचारच्या सुमारास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुनीलजित पाटील यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे दोन्ही बाजूंचा संवाद होऊ शकला नाही. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी संशयित आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी विनंती यावेळी केली. त्यावर न्या. पाटील यांनी समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करीत असल्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
समीरला काही सांगायचे आहे
समीर गायकवाड याची कळंबा कारागृहात त्याचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी शनिवारी सकाळी भेट घेतली. यावेळी समीरने तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याला न्यायालयाला पत्र द्यायचे आहे किंवा न्यायालयात स्वत: हजर राहून सांगायचे आहे. त्यामुळे त्याला आजच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करावे, असा अर्ज अॅड. इचलकरंजीकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांना दिला. त्यावर न्या. डांगे यांनी १७ नोव्हेंबर ही सुनावणीची तारीख देत, सरकारी वकिलांनी म्हणणे सादर करावे. त्यानंतर या अर्जावर निकाल दिला जाईल, असे सांगितले.