समीर जोशीचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: July 6, 2016 01:42 AM2016-07-06T01:42:13+5:302016-07-06T01:42:13+5:30
श्रीसूर्या घोटाळा प्रकरणातील आरोपी समीर जोशी तीन वर्षांपासून आहे कारागृहात.
अकोला : गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या कंपनीचा संचालक समीर जोशी याचा जामीन अर्ज मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.
श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा संचालक समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी यांनी अकोल्यासह राज्यातील अनेक शहरांमधील गुंतवणूकदारांना कंपनीच्या विविध आकर्षक योजनांचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची रक्कम गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केलेली रक्कम दामदुप्पट व भरघोस व्याज देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविले आहे. या प्रकरणी समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी व एजंटवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. समीर जोशी गत तीन वर्षांंंपासून नागपूर कारागृहात असून, त्याच्या पत्नीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. रामदासपेठ आणि खदान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हय़ात समीर जोशीच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने समीर जोशीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणी आरोपीतर्फे अँड. आशीष देशमुख यांनी, तर सरकार पक्षातर्फे अँड. आर. आर. देशपांडे यांनी कामकाज पाहिले.
पुरवणी दोषारोपपत्र नाही
श्रीसूर्या घोटाळय़ातील आरोपी समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी वगळता अन्य आरोपींचे पुरवणी दोषारोपपत्र गत दोन वर्षांंंपासून अद्यापही न्यायालयात दाखल करण्यात आलेले नाही. श्रीसूर्या घोटाळय़ातील अन्य आरोपींचा घोटाळय़ात सक्रिय सहभाग असताना त्यांचे दोषारोपपत्र सादर करण्यास वेळ लागत आहे.
४0 हजार पानांचे दोषारोपपत्र
श्रीसूर्या घोटाळय़ामध्ये अमरावती आणि नागपूर पोलिसांनी तपास पूर्ण करून तब्बल ४0 हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे, तर अकोल्यातील घोटाळय़ात समीर जोशी व पल्लवी जोशी वगळता अन्य आरोपींचे पुरवणी दोषारोपपत्रही पोलिसांनी न्यायालयात सादर केले नाही. श्रीसूर्या घोटाळय़ात आरोपी असलेल्यांची अमरावती आणि नागपूर येथील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, तर अकोल्यातील मालमत्ता जप्तीसंदर्भात अद्यापही काहीच कारवाई झालेली नाही.
फरार आरोपींना जामीन
श्रीसूर्या घोटाळय़ातील आरोपी पितळे पिता-पुत्र, शंतनु कुर्हेकरसह अकोल्यातील अन्य आरोपी तब्बल दीड वर्ष फरार होते. या फरार आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर समीर जोशी तीन वर्षांंंपासून कारागृहात असून, त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.