समीर न्यायालयीन कोठडीत
By admin | Published: February 9, 2016 12:24 AM2016-02-09T00:24:32+5:302016-02-09T00:24:32+5:30
बोगस कंपन्या स्थापन करून ‘मनी लॉड्रिंग’ केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या समीर भुजबळ याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)
- डिप्पी वांकाणी, मुंबई
बोगस कंपन्या स्थापन करून ‘मनी लॉड्रिंग’ केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या समीर भुजबळ याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न केल्याने तसेच समीरच्या वतीनेही जामिनासाठी अर्ज करण्यात न आल्याने येथील सत्र न्यायालयाने समीरला २२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने पंकज भुजबळची लवकरच चौकशी होणार असून त्याच्यासमोर समीर भुजबळला आणून प्रश्न विचारायचे आहेत यासाठी त्याची कोठडी मागण्याचा हक्क ईडीने राखून ठेवला आहे. सध्या समीर भुजबळला आर्थर रोडवरील अतिसुरक्षेच्या तुरुंगातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
गेल्या सहा दिवसांत समीरने भुजबळांच्या मालकीच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे दस्तावेज सादर केले. परंतु त्याने परवेश कन्स्ट्रक्शन्स आणि देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर्स या दोन मुख्य कंपन्यांचे दस्तावेज दिले नाहीत, असे ईडीचे म्हणणे आहे. आधी या दोन कंपन्यांमध्ये निधी भरला गेला व नंतर हेक्स वर्ल्ड प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी तो काढून घेण्यात आला. त्यामुळे हे दस्तावेज मिळणे आवश्यक आहे, असे ईडीने त्याची कोठडी मागण्यासाठी केलेल्या अर्जात म्हटले होत.
ईडीने अर्जात म्हटले की, या दोन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिशय गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. हिशेबांच्या पुस्तकांत निधीचे हस्तांतर हे कर्ज म्हणून किंवा उचल (अॅडव्हान्स) म्हणून सोयीनुसार दाखविण्यात आले आहेत. मात्र नोंदींना आवश्यक कागदपत्रे ठेवण्यात आलेली नाहीत. चौकशीत या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कोणताही व्यवसाय झाल्याचे दिसत नाही. या कंपन्यांनी केलेल्या व्यवहारांचे प्रचंड स्वरूप पाहता ते पैसे स्वीकारणे आणि गुन्हेगारी कारवायांतून निर्माण झालेला पैसा हवाला व्यवहारात वापरणे, असे दिसते. रिअल इस्टेट व्यवहारांना साह्यभूत होईल अशा कराराच्या प्रतीही अजून सादर झालेल्या नाहीत, असेही ईडीने त्या अर्जात म्हटले आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार समीर भुजबळ हा त्याच्या चौकशीत अजूनही त्याचा चार्टर्ड अकाउंटंट सुनील नाईक यालाच दोष देतो आहे.
ईडीने न्यायालयाला असेही सांगितले की, आम्ही भुजबळचे दोन विश्वासू नीलेश शाहू आणि अप्पा केसरकर यांची चौकशी केली. हे दोघे आणि समीर भुजबळ समोरासमोर येणे आवश्यक आहे कारण भुजबळांनी स्थापन केलेल्या काही कंपन्यांमध्ये या दोघांना संचालक दाखविण्यात आले आहे. ६ फेब्रुवारी रोजी ईडीने शाहूच्या घरी छापा घातला होता, परंतु तो तेथे न सापडल्यामुळे त्याच्या घराला सील लावण्यात आले आहे.
ईडीवर आरोप
- साक्षीदारांना लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र ईडी निर्माण करू पाहत आहे, असा आरोप भुजबळच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. भुजबळांचे निकटवर्ती नीलेश शाहू आणि अप्पा केसरकरचा ठावठिकाणा लागू शकत नाही, असे ईडीने रिमांड मागताना सांगितले होते.
याचा उल्लेख करताना अॅड. देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, शाहू अमेरिकेत असून वर्षभरापूर्वीच त्याने अमेरिका प्रवासाचा बेत ठरविला होता. एक-दोन दिवसांत शाहू परतणार आहे. केसरकर ईडीच्या दिल्लीतील कार्यालयात जाऊन आला होता.
भुजबळ आगमनावेळी होणार शक्तिप्रदर्शन
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मंगळवारी अमेरिका दौऱ्यावरून मुंबईत परत येत असून, विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. स्वत: भुजबळ यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाणार का, याबाबत ईडीचे अधिकारी काहीही सांगण्यास तयार नाहीत.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारत बांधकाम कंत्राटातील अनियमिततेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तर मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्या मालमत्तांवर छापे घातले आहेत. भुजबळ सध्या अमेरिकेत असून मंगळवारी दुपारी बारा वाजता ते मुंबईत परत येत आहेत. त्यांच्या आगमनाच्यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता भुजबळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील.