ब्रेन मॅपिंग चाचणीला समीरचा नकार
By admin | Published: October 10, 2015 01:37 AM2015-10-10T01:37:13+5:302015-10-10T01:37:13+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित समीर गायकवाड याने शुक्रवारी न्यायालयासमोर ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यास नकार दिला.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित समीर गायकवाड याने शुक्रवारी न्यायालयासमोर ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यास नकार दिला. मानसिक अवस्था ठीक नसल्याने चाचणी घेण्यास इच्छुक नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे तपास यंत्रणेचा यासंबंधीचा अर्ज नामंजूर करून २३ आॅक्टोबरपर्यंत समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केल्याचा निर्णय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी दिला.
तपासकामात गायकवाड सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी सादर केला होता.
त्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. तुझी ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यास पोलीस इच्छुक आहेत,
असे न्यायमूर्र्तींनी समीरला सांगितले.
तेव्हा माझी मानसिक अवस्था
ठीक नसल्याने मी चाचणी
करण्यास इच्छुक नसल्याचे समीरने सांगितले.
याबाबत युक्तिवाद करताना गायकवाडचे वकील समीर पटवर्धन आणि अॅड. विवेक घाटगे यांच्यात काहीवेळ शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर न्यायमूर्ती डांगे यांनी समीरला संमतीसाठी आणखी वेळ हवा का? असे विचारले असता त्याने त्याची गरज नसल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना सादर केलेला ब्रेन मॅपिंगचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे न्यायमूर्ती डांगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उच्च न्यायालयात अपील करणार
संशयित समीर गायकवाड याने ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यास नकार दिला; त्यामुळे पानसरे कुटुंबीयांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांच्याशी चर्चा करून या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे मेघा पानसरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
न्यायमूर्ती डांगे यांनी ‘इन कॅमेरा’ सुनावणी घेऊ. त्यासाठी इतर लोकांनी व वकिलांनी बाहेर थांबावे, असे सांगितले. परंतु काही वेळ थांबून त्यांनी सर्वांसमोरच सुनावणी घेतली.