समीरनेच गोळ्या झाडल्या ?

By admin | Published: September 18, 2015 02:46 AM2015-09-18T02:46:08+5:302015-09-18T02:46:08+5:30

गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या सांगण्यावरून मारेकऱ्यांचे रेखाचित्र बनविले होते. संशयित समीर गायकवाड याचा चेहरा या रेखाचित्रांशी

Sameer shot the tablets? | समीरनेच गोळ्या झाडल्या ?

समीरनेच गोळ्या झाडल्या ?

Next

पानसरे हत्या प्रकरण : चेहरा रेखाचित्राशी मिळताजुळता; प्रेयसीही सहभागी

कोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या सांगण्यावरून मारेकऱ्यांचे रेखाचित्र बनविले होते. संशयित समीर गायकवाड याचा चेहरा या रेखाचित्रांशी मिळताजुळता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पानसरे यांच्या हत्येचा कट रचण्यापासून त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यामध्ये समीरच पुढे असल्याची महत्त्वाची माहिती पोलीस तपासात निष्पन्न होत असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी तयार केलेल्या रेखाचित्रांमध्ये एकाचा रंग सावळा, चेहरा उभट, नाक टोकदार, तुरळक भुवया आहेत; तर दुसऱ्या मारेकऱ्याचा चेहरा गोल, रंग सावळा, नाक टोकदार असून दोघांच्याही डोक्याला हिवाळी गुलाबी-तांबूस रंगाची मळकट टोपी व काळी दाढी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने अंगामध्ये कुर्ता व शबनम बॅग अडकविलेली दिसत होती. तयार करण्यात आलेले रेखाचित्र हे मारेकऱ्यांशी ८० टक्के मिळतेजुळते आहे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. समीर गायकवाड याचा चेहरा रेखाचित्रांशी मिळताजुळता असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानेच पानसरे यांच्या हत्येचा कट रचून स्वत: पानसरे दाम्पत्यावर गोळ्या झाडल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी गायकवाडने कबुली दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पानसरे को मारा, दूसरे को भी मारूॅँगा
संशयित समीर गायकवाड याचे प्रेयसीसोबत मोबाईलवर संभाषण झाले. त्यामध्ये ‘पानसरे को मारा और एक बाकी है, उसको भी मारुँगा..!’ असा अस्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला आहे. असे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.

‘सीबीआय’चे पथक कोल्हापुरात
पानसरे हत्येप्रकरणी दिल्लीहून ‘सीबीआय’चे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात आले. या पथकातील अधिकाऱ्यांनी समीर गायकवाड याची पोलीस मुख्यालयात चार तास कसून चौकशी केली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याच्याबाबतीत प्राप्त केलेले पुरावे तपासून पाहिले.
कोल्हापूर पोलिसांनी संशयित समीरच्या ‘ज्योती’ नावाच्या मुंबईतील प्रेयसी आणि संकेश्वर येथील दोन नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्या मोबाईल संभाषणाच्या आवाजाचे नमुने गुजरातला पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्याप्रकरणी सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता समीरला(३२) बुधवारी पहाटे कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यावरून ज्यांच्याशी त्याचे संभाषण झाले, त्यामध्ये एका तरुणीसह दोघा तरुणांचा समावेश होता. पोलिसांनी त्यांच्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने ते मुंबई, पणजी, संकेश्वर येथे राहत असल्याचे सांगितले. सर्वांत जास्त मोबाईल कॉल्स ज्या तरुणीला झाले होते. तिच्याशी तुझे काय संबंध आहेत, अशी विचारणा केली असता ती आपली प्रेयसी असल्याची कबुली त्याने दिल्याचे समजते. बुधवारी रात्री उशिरा त्याच्या मुंबईतील प्रेयसीसह जवळच्या दोन नातेवाइकांना ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी दिवसभर त्यांची कसून चौकशी झाली. त्याच्यासह प्रेयसी व गायकवाडच्या दोन नातेवाइकांच्या आवाजाचे नमुने चाचणीसाठी गुजरातला पाठविले.

पुण्याच्या ‘सायबर सेल’चे पथक कोल्हापुरात
पुणे येथील ‘सायबर सेल’चे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. गायकवाडकडून २३ मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलवरून व ई-मेल आणि फेसबुकवरून त्याने आतापर्यंत कोणते संदेश (मेसेज) पोस्ट केले आहेत, त्याची माहिती हे पथक स्वतंत्रपणे तपास करून घेत आहे.

घटनास्थळी ‘ज्योती’ होती मोटारसायकलवर
- पानसरे दाम्पत्यावर हल्ला झाला तेथील सरस्वती चुणेकर विद्यालयातून जे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले होते, त्याची तपासणी करण्यासाठी विविध संस्थांची मदत घेतली असता, शाळेतील कॅमेऱ्यामध्ये पानसरे दाम्पत्य चालत गेल्यानंतर काही सेकंदांत मोटारसायकलवरून दोघे जण जात असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यावर पाठीमागे बसलेली व्यक्ती तरुणी असल्याचा संशय सुरुवातीपासून होता. त्यामुळे हत्येमागे गायकवाडच्या प्रेयसीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यानुसार ते चौकशी करीत आहेत.

मस्करी केली
-समीर गायकवाड याच्याकडे पोलीस चौकशी करीत असताना त्याने ‘आम्ही चेष्टा-मस्करीमध्ये पानसरेंच्या हत्येसंदर्भात फोनवर बोलत होतो. या हत्येशी माझा काहीही संबध नाही,’ असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस तो सांगेल त्या माहितीची अत्यंत बारकाईने खातरजमा करीत असल्याचे तपास पथकाचे प्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी सांगितले.

पानसरे हत्येप्रकरणी आणखी तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित समीर गायकवाड हा तपासात सहकार्य करीत नाही. त्याच्यासह चौघांकडे चौकशी सुरू असून, लवकरच यामागील चित्र स्पष्ट होईल.
- संजयकुमार, अप्पर पोलीस महासंचालक,
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग

Web Title: Sameer shot the tablets?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.