तीन लोकांनी घराची रेकी केली, कुटुंबाला धोका! समीर वानखेडेंच्या पत्नीनं केली संरक्षणाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 09:59 PM2021-10-31T21:59:50+5:302021-10-31T22:02:18+5:30
समीर वानखेडे हे क्रुझ ड्रग्स प्रकरण समोर आल्यापासूनच चर्चेत आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह कोही लोकांना अटक करण्यात आली होती.
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी पती समीर आणि कुटुंबीयांची सुरक्षितता धोक्यात असल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी तिन लोकांनी आमच्या घराची रेकी केली असून आम्ही पोलिसांना त्याचे सीसीटीव्ही फुटेजही देऊ, असे सांगत, आमच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे, अशी मागणी क्रांती रेडकर यांनी केली आहे.
समीर वानखेडे हे क्रुझ ड्रग्स प्रकरण समोर आल्यापासूनच चर्चेत आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह कोही लोकांना अटक करण्यात आली होती. यानंतर, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने नवनवे आरोप करत आहेत. मलिक यांनी नुकताच दावा केला होता, की समीर वानखेडे आणि त्याचे कुटुंब मुस्लीम आहे आणि सरकारी नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केले. पण, समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
क्रांती रेडकर यांचा 2017 मध्ये समीर वानखेडे यांच्याशी विवाह झाला आहे. नुकतेच, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, मलिक आपल्या पतीवर खोटे आरोप करून घाणेरडे राजकारण करत असल्याचे क्रांती यांनी म्हटले होते.
रामदास अठावलेंचं वानखेडेंना समर्थन -
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आता समीर वानखेडे यांच्या समर्थनात पुढे आले आहेत. ते म्हणाले, "मी नवाब मलिक यांना सांगू इच्छितो, की त्यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करणे थांबवावे. जर ते म्हणत असतील, की समीर मुस्लीम आहेत, तर मग मुसलमानावर आरोप का करत आहात." आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी समीर वानखेडे यांच्यासोबत उभी आहे. समीर यांना कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.