Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या; नोकरीच्या वादात भीम आर्मीची उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 09:20 AM2021-11-05T09:20:01+5:302021-11-05T09:20:23+5:30
Sameer Wankhede Vs. Bhim Army: मलिक यांच्याकडून वारंवार होत असलेल्या आरोपांच्या विरोधात समीर वानखेडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांची भेट घेतली होती.
समीर वानखेडे प्रकरणात भीम आर्मीची उडी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक व एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू असताना भीम आर्मी संघटनेने त्यामध्ये उडी घेतली आहे. वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरी मिळविली असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मी व स्वाभिमानी रिपब्लिकन आर्मीने संघटनेने केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. जात पडताळणी समितीमार्फत त्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे.
वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी ते ‘एससी’ असल्याचचे सांगितले होते. आरक्षण मिळवण्यासाठी वानखेडे यांनी बनावट कागदपत्रे दाखवली होते, त्यांच्यामुळे समाजातील एका होतकरु उमेदवाराची संधी डावलली गेली आहे, असा आरोप भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन आर्मीने केला आहे. या दोन्ही संघटनांनी मुख्यमंत्री व जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रारही केली आहे.
दरम्यान, मलिक यांच्याकडून वारंवार होत असलेल्या आरोपांच्या विरोधात समीर वानखेडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांची भेट घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षांना सर्व कागदपत्रे सादरही केली होती. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे.