Sameer Wankhede यांनी मालदीव, दुबईमध्ये कलाकारांकडून केली वसुली, Nawab Malik यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 01:56 PM2021-10-21T13:56:48+5:302021-10-21T13:57:26+5:30
Mumbai Cruise Drug Case: NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Nawab Malik यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा कायम आहे.
मुंबई - एनसीबीचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्याविरोधात राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा कायम आहे. नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीने मालदीव आणि दुबईमध्ये बॉलिवूड कलाकारांकडून वसुली केली, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक म्हणाले की, कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही तिकडे उपस्थित होते. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, मालदीवमधील फोटो शेअर करून समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील सदस्य तिथे उपस्थित होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला अजून एक वळण लागण्याची शक्यता आहे. मात्र नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बहिणीवर केलेल्या आरोपांना मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला.