'आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केले', समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 04:51 PM2021-10-27T16:51:47+5:302021-10-27T16:56:15+5:30
'मी जन्माने हिंदू आणि दलित कुटुंबातील आहे. मी आजही हिंदू आहे, धर्म कधीच बदलला नाही.'
नवी दिल्ली: मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. नवाब मलिक यांनी आज निकाहनामा शेअर केला होता, ज्यामध्ये समीर यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले होते.
नवाब मलिकांच्या आरोपांवर समीरने उत्तर दिले की, मी जन्माने हिंदू आहे आणि दलित कुटुंबातून आलो आहे. मी आजही हिंदू आहे. धर्म कधीच बदलला नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती. मला दोन्ही आवडतात. माझी आई मुस्लिम होती आणि मी मुस्लिम पद्धतीने लग्न करावे अशी तिची इच्छा होती, म्हणून मी माझ्या आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केलं, अशी महत्वाची माहिती त्यांनी दिली
नवाब मलिकांना आव्हान...
वानखेडे पुढे म्हणाले की, लग्न झाले त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्नाची नोंदणी केली होती. दोन वेगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात, तेव्हा एक विशेष करार असतो, यात धर्म बदलत नाही. काही काळानंतर आमचा कायदेशीर घटस्फोटही झाला आहे. मी जर धर्म बदलला असेल तर नवाब मलिकांनी त्याचे प्रमाणपत्र दाखवावे, असे आव्हानही वानखेडे यांनी दिले.
नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट
नवाब मलिक यांनी समीर वानखेडेशी निगडीत लग्नाचे डॉक्युमेंड आज ट्विटरवर शेअर केले आहेत. हे समीर दाऊद वानखेडेचे लग्न असल्याचे त्यांनी फोटोसोबत लिहिले. तसेच, समीर यांचा विवाह डॉक्टर शबाना कुरेशी यांच्याशी 7 डिसेंबर 2006 रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पश्चिम मुंबई येथे झाला, होता असे ते म्हणाले. नवाब मलिक यांनी जोडप्याचा फोटोही शेअर केला आहे.
नोकरीसाठी बनावट कागदपत्र बनवले
यावेळी मलिक यांनी नोकरीसाठी बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोपही केला. समीर वानखेडेचे वडील हिंदू दलित तर आई मुस्लिम असल्याचे नवाब मलिक यांचे म्हणणे आहे. लग्नानंतर वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. जेव्हा कोणी मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करतो तेव्हा त्याचा त्याच्या जुन्या जातीशी काहीही संबंध नसतो. मात्र समीर वानखेडे यांनी आरक्षणाचा वापर केला. बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवून गरिबांच्या हक्कावर गदा आणली, असं मलिक म्हणाले.