खटला वर्ग करण्याचा समीरचा अर्ज मागे
By admin | Published: February 19, 2016 03:38 AM2016-02-19T03:38:58+5:302016-02-19T03:38:58+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी समीर गायकवाडने खटला कोल्हापूर सत्र न्यायालयातून अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात केलेला अर्ज गुरुवारी मागे घेतला
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी समीर गायकवाडने खटला कोल्हापूर सत्र न्यायालयातून अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात केलेला अर्ज गुरुवारी मागे घेतला. उच्च न्यायालयानेही अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली.
समीर गायकवाडने कोल्हापूरच्या सत्र न्यायालय आणि कोल्हापूर बार असोसिएशनविरुद्ध तक्रार करत ही केस कोल्हापूर न्यायालयातून अन्य न्यायालयात वर्ग करण्यात यावी, अशी विनंती अर्जाद्वारे उच्च न्यायालयाला केली होती.
कोल्हापूरमध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही. तेथील बार असोसिएशन खटला लढवण्यासाठी एकही वकील देण्यास तयार नाही. तसा ठरावच त्यांनी केल्याचे गायकवाड याने अर्जात म्हटले होते. तसेच सुनावणीवेळी वकीलच न्यायालयात गोंधळ घालतात आणि कोल्हापूरमध्ये आपल्याविरुद्ध निदर्शने करण्यात येतात. त्यामुळे कोल्हापूरमध्ये न्याय मिळणार नाही. त्यामुळे हा खटला अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावी, अशी मागणी गायकवाडने अर्जाद्वारे केली होती.
गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यावर पोलिसांनी उत्तर
देत कोल्हापूर बार असोसिएशनचे पत्रही उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आले.
या पत्रात कोल्हापूर बार असोसिएशनने गायकवाडला वकील न देण्यासंदर्भात कोणाताही ठराव मंजूर केला नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्याला हव्या असलेल्या वकिलाला तो त्याचा खटला लढवण्यासाठी नियुक्त करू शकतो, असेही म्हटले.
बार असोसिएशनच्या वकील न देण्याच्या भूमिकेमुळे गायकवाडने खटला वर्ग करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र बार असोसिएशनने
त्यांची भूमिका स्पष्ट करत समीरला वकील देण्याची तयारी दर्शवल्याने हा अर्ज मागे घेत आहोत, असे गायकवाडच्या वकिलांनी न्या. आर. पी. सोंदुरबलदोटा यांना सांगितले. त्यावर न्या. सोंदुरबलदोटा यांनी हा अर्ज मागे घेण्याची परवानगी गायकवाडला दिली. (प्रतिनिधी) पुंगळ्या, गोळी सीबीआयच्या ताब्यात
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील घटनास्थळावरून जप्त केलेल्या पाच पुंगळ्या तसेच डॉक्टरांनी पानसरे यांच्या शरीरामधून काढलेली एक गोळी गुरुवारी नवी मुंबई येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या पथकाला देण्यात आली. या पुंगळ्या व गोळी नवी दिल्लीतील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज (सीएफएसएल) येथे तपासण्यात येणार आहेत.