समीरचा जामीन अर्ज फेटाळला
By Admin | Published: January 29, 2016 02:08 AM2016-01-29T02:08:56+5:302016-01-29T02:08:56+5:30
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी व सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याचा जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी व सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याचा जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांनी गुरुवारी फेटाळला. सनातन संस्थेशी संबंधित ज्योती कांबळे, अंजली झरकर व सुनील खमितकर हे तिघे या खटल्यातील ‘सनातन’चे साक्षीदार आहेत. या साक्षीदारांना भेटून समीर त्यांच्यावर दबाव आणू शकतो, हा मुद्दा न्यायालयाने विचारात घेऊन, समीरचा जामीन अर्ज नामंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी ९ फेबु्रवारी २०१६ रोजी होणार आहे.
समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावणी होती. यासाठी सरकार पक्षाच्या वतीने अॅड. हर्षद निंबाळकर यांच्यासह अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे, तर आरोपीच्या वतीने अॅड. समीर पटवर्धन व अॅड. आनंद देशपांडे (सांगली) हे दोघे जण न्यायालयात उपस्थित होते. दुपारी समीर गायकवाडचा जामीन अर्ज बिले यांनी फेटाळला. त्यानंतर अॅड. पटवर्धन यांनी कोणत्या मुद्द्यांच्या आधारे जामीन अर्ज फेटाळला, असा विनंती अर्ज न्यायालयात सादर केला. याबाबत अॅड. समीर पटवर्धन यांना विचारले असता ते म्हणाले, ‘न्यायालयाने समीर गायकवाडविरोधातील आरोपपत्र निश्चित करावे. या खटल्याचे कामकाज जलद गतीने सुरू व्हावे, अशी आमची मागणी आहे. यानंतर अॅड. विवेक घाटगे यांनी, पानसरे हत्येतील विविध मुद्द्यांचा आधार घेत, न्यायालयाने समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला,’ असे पत्रकारांना सांगितले.(प्रतिनिधी)
राज्य शासनाकडे आम्ही गोविंद पानसरे हत्येसंदर्भात अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार, शासनाने अॅड. निंबाळकर यांची या खटल्यासाठी नियुक्ती केली. समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत.
- मेघा पानसरे, गोविंद पानसरे यांच्या स्नुषा
समीर गायकवाडचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे समीर गायकवाडवर न्यायालयाने आरोप निश्चित करावेत, त्यासाठी हा खटला जलद गतीने व त्वरित सुरू करावा.
- अॅड. समीर पटवर्धन, आरोपी समीर गायकवाडचे वकील