समीरची ब्रेन मॅपिंग, नार्को तपासणी करणार
By admin | Published: September 25, 2015 12:33 AM2015-09-25T00:33:31+5:302015-09-25T00:34:03+5:30
पानसरे हत्या प्रकरण : फॉरेन्सिक लॅबचा अहवाल दोन दिवसांत हाती
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची लवकरच ब्रेन मॅपिंग आणि नार्को तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.समीर गायकवाड याला अटक केल्यानंतर त्याने कोल्हापूर पोलिसांना तपासात अपेक्षित सहकार्य केलेले नाही. त्याची आठ दिवसांची पोलीस कोठडी बुधवारी (दि. २३) संपली. त्यामुळे त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्यात आली.
गेल्या आठ दिवसांत समीरकडे तपास करताना पोलिसांच्या हाती त्याचे मोबाईलवरील संभाषण हाच ठोस मुद्दा मिळाला आहे. त्याने संकेश्वर येथे कट रचल्याबद्दलही पोलीस माहिती काढत आहेत; पण तो पोलिसांना तपासकामात अपेक्षित सहकार्य करीत नसल्याने त्याची लवकरच नार्को आणि ब्रेन मॅपिंग तपासणी करण्यात येणार आहे; पण त्यासाठी समीरची मान्यता घेणे बंधनकारक आहे. याशिवाय गुजरात येथील गांधीनगर फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने त्याचे व्हाईस रेकॉर्डिंग, संभाषण, कॉल डिटेल्स तसेच त्याच्या वर्तणुकीबाबत तपासणी केली होती. त्याचाही अहवाल येत्या दोन दिवसांत येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अहवाल आल्यानंतरच त्याच्या कॉलवरील संभाषणांचा बऱ्यापैकी उलगडा होणार आहे.
दरम्यान, समीरला सांगली येथे त्याच्या निवासस्थानी छापा टाकून कोल्हापूर पोलिसांनी दि. १६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यावेळी त्या छाप्यात त्याच्या निवासस्थानी जप्त केलेल्या अनेक कागदपत्रांसह सुमारे ३१ मोबाईलच्या सीमकार्डांबाबतही तपासणी करण्यात येणार आहे. ही मोबाईलची सीमकार्ड सांगली, मुंबई, ठाणे, पनवेल, गोवा, बेळगाव (कर्नाटक) येथील काही व्यक्तींची नावेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहेत. या सर्वांना समीरच्या वाढीव पोलीस कोठडीच्या मुदतीत कोल्हापुरात बोलावून घेऊन त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. त्या दृष्टीने पोलिसांची तपासणी सुरू झाली आहे. या तपासणीमध्ये संबंधित व्यक्तींची ओळख परेड घेण्यात येणार आहे.
दरम्यान, गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात समीर गायकवाड याचीही आणखी कसून चौकशी करण्यात आली. (प्रतिनिधी)