समीरचा इंग्लीश खाडी पोहून विक्रम, ४६ भारतीयांमध्ये समावेश : जगभरातील १,८२० स्वीमर्समध्ये नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 06:38 AM2017-10-19T06:38:23+5:302017-10-19T06:38:35+5:30
- आविष्कार देसाई
अलिबाग : इंग्लिश खाडी पोहून जाण्यामध्ये आता आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला आहे. अलिबागच्या जनरल अरु णकुमार वैद्य हायस्कूलचा माजी विद्यार्थी समीर दिनकर पाटील याने हा पराक्र म केला आहे. इंग्लिश खाडी पोहून जाणाºया ४६ भारतीयांमध्ये आणि जगभरातील एक हजार ८२० स्वीमर्समध्ये समीरचे नाव कोरले गेले आहे.
समीर पाटील याने २६ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ब्रिटिश प्रमाणवेळेप्रमाणे ६ वाजता इंग्लंडमधून इंग्लिश खाडी पोहण्यास सुरु वात केली. त्या वेळी पायलट म्हणून फ्रेड मार्डल हे त्याच्यासोबत होते. क्रू मेंबर म्हणून दीप्ती, विनिता, अतुल आणि सिल्व्हिया यांनी काम पाहिले. सुरु वातीला शांत असलेला समुद्र काही कालावधीनंतर हवामान बदलल्याने खवळला. त्यामुळे समीरला पोहताना अडथळे निर्माण झाले, परंतु समीरने जिद्दीने आपले प्रयत्न सुरू ठेवले. सूर्यास्तानंतर पाण्याचे तापमान वेगाने खाली येऊ लागले. प्रतिकूल प्रवाहांच्या वेगामुळे अंतर कापण्यास जास्त प्रयास करावे लागत होते, तरीही आव्हानांचा समर्थपणे सामना करून समीरने ब्रिटिश प्रमाणवेळेनुसार ९.३० वाजता फ्रान्सचा किनारा गाठला. हे अंतर पोहून जाण्यासाठी समीरला १५ तास १९ मिनिटांचा वेळ लागला. फ्रान्सच्या किनाºयावर या टीमच्या स्वागतासाठी बोर्ड आॅफ चॅनेल स्वीमिंग असोसिएशनच्या सचिव सूसान रॉक्टीक उपस्थित होत्या. त्यांनी असोसिएशनतर्फे त्याच्या कामगिरीचे प्रमाणपत्र देऊन त्याचे कौतुक केले.
समीरचा जन्म ठाण्यातील असला तरी त्याचे शिक्षण अलिबागच्या अरु णकुमार वैद्य हायस्कूलमध्ये १०वी पर्यंत झाले होते. पुढे त्याने इलेक्ट्रॉनिकचा डिप्लोमा सांगली येथील वालचंद कॉलेजमध्ये केला. २००० मध्ये त्याने सोमय्या कॉलेज आॅफ इंजिनीयरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी संपादन केली. समीरचे वडील दिनकर पाटील हे सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागमध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर काम करीत होते.
समीर पाटीलचे इंग्लिश खाडी पोहून जाण्याचे स्वप्न होते. ते त्याने गेले १० वर्षे अथक मेहनत करून पूर्ण केले. ३० डिसेंबर २०१५ ला त्याने धरमतर खाडी ते गेट वे आॅफ इंडिया हे अंतर ९ तासांत पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने फ्रेड मार्डेल यांच्या मार्गदर्शनाखाली चॅनेल स्वीमिंग असोसिएशनमध्ये नोंदणी करून प्रशिक्षणाला सुरु वात केली.
ठाणे येथील स्वीमिंग पूलमध्ये सकाळी प्रथम दोन तास सराव करून तो नंतर कामावर जात असे. तो टी.सी.एस.एल. येथे गेल्या १५ वर्षांपासून नोकरी करीत आहे. आपल्या सरावाचा अवधी त्याने २ तासांपासून पुढे १२ तासांपर्यंत वाढविला.
सुजीत आणि बशीर यांनी सरावासाठी मदत केली. त्यानंतर समीरने साऊथ इंग्लंडमधील डोव्हर येथे जाऊन चार महिने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वीमर्सबरोबर सराव केला. तेथे आॅस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंतचे स्वीमर सहभागी झाले होते. पाण्याचे तापमान ८ ते १८ डिग्री सेल्सियस असताना हा सराव करावा लागत होता. तेथे इमा फ्रान्स या त्याच्या मार्गदर्शक होत्या. समीरने आपल्या या यशात अलिबागच्या विलोभनीय समुद्राचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.