समीरवर ३९२ पानी आरोपपत्र

By admin | Published: December 15, 2015 02:42 AM2015-12-15T02:42:48+5:302015-12-15T02:42:48+5:30

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात सोमवारी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडवर ३९२ पानांचे दोषारोपपत्र

Samir 392 water chargesheet | समीरवर ३९२ पानी आरोपपत्र

समीरवर ३९२ पानी आरोपपत्र

Next

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात सोमवारी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडवर ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात ७७ साक्षीदारांचे जबाब, समीरच्या दोन मैत्रिणी, एक मित्र, त्याने मोबाइलवरून इतरांना केलेल्या कॉलच्या संभाषणाचा प्रयोगशाळेने दिलेला अहवाल, तसेच त्याने ‘क्षात्रधर्म साधना’ हे पुस्तक वाचून त्यातील संदर्भाद्वारे पानसरे यांच्या हत्येचा कट रचला आदी बाबींचा समावेश आहे.
समीरवर खून, खुनाचा प्रयत्न, हत्येचा कट रचणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समीरला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पानसरे हत्या प्रकरणातील कागदपत्रे, अन्य पुरावे गोळा करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना न्यायालयाने परवानगी दिली. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर सागरमाळ येथे १६ फेबु्रवारी २०१५ ला गोळीबार झाला होता.
त्यात पानसरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १६ सप्टेंबर २०१५ रोजी सांगलीतील समीर गायकवाड (२९) यास विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) अटक केली. एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी समीरचे दोषारोपपत्र तयार केले. (प्रतिनिधी)

असे आहे दोषारोपपत्र
संशयित समीर दुचाकीवरून गोळ््या झाडून घटनास्थळावरून पळून जाताना, त्याच परिसरातील एका शाळकरी मुलाने पाहिले.
समीरचे त्याच्या मैत्रिणी ज्योती कांबळे (रा.भांडुप, मुंबई) व अंजली झरकर (रा. गजानननगर नाळवडी नाका, ता. जि. बीड. सध्या रा. देवद आश्रम, पनवेल) व मित्र सुमित खामणकर (रा. वणी, जि.यवतमाळ) यांच्याबरोबरचे मोबाइलवरील संभाषण. त्यात ‘ज्याला मारायचे आहे, त्याला मारले आहे, आता कोणी शत्रू नाही.. मी जाऊन येतो, नाशिकच्या कुंभमेळ््याला, लई पापं केली आहेत, डुबक्या मारून येतो, लय नाही, फक्त दोनच केली आहेत,’ असे संभाषण त्याने २७ जून २०१५ ला दोन वेळा व २१ जुलै २०१५ ला केले होते, असा उल्लेख.
‘पानसरे झाला, आता नितीन वागळेचा करू का..’ असे तो ज्योती कांबळे हिच्याबरोबर १९ जून २०१५ ला मोबाइलवर बोलल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे.

मेघा पानसरेंची विनंती
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, पानसरे यांची स्नुषा मेघा, नातू मल्हार, दिलीप पवार आदींनी जिल्हा पोलीसप्रमुख प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन, दोषारोपपत्रात त्रुटी राहू नयेत, याची दक्षता घेण्याची पोलिसांना विनंती केली.

Web Title: Samir 392 water chargesheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.