समीर वानखेडे यांना चौकशीला बोलावले; १८ मे रोजी हजेरी; सीबीआयचे समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 06:15 IST2023-05-17T06:14:44+5:302023-05-17T06:15:41+5:30
वानखेडे यांच्या विरोधात ११ मे रोजी सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. तसेच त्यांच्या व त्यांच्याशी संबंधित लोकांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती.

समीर वानखेडे यांना चौकशीला बोलावले; १८ मे रोजी हजेरी; सीबीआयचे समन्स
मुंबई : कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा ठपका ठेवत आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता गुरुवारी, १८ मे रोजी वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. या चौकशीदरम्यान त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. वानखेडे यांच्या विरोधात ११ मे रोजी सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. तसेच त्यांच्या व त्यांच्याशी संबंधित लोकांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती.
कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीदरम्यान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या इशाऱ्यावरून या प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी शाहरुख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा उल्लेख सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये केला आहे. तसेच, २५ कोटी रुपयांचा हा सौदा १८ कोटींवर निश्चित झाला आणि त्यापैकी ५० लाख रुपये किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी स्वीकारले. मात्र, नंतर ते ५० लाख परत केले, असे सीबीआयने नमूद केले आहे. या खेरीज, कोर्डिलिया क्रूझवरील छापेमारी दरम्यान २७ लोकांची नावे पुढे आली होती. मात्र, केवळ १७ लोकांना कोणत्याही लेखी नोंदीशिवाय सोडून दिले व १० जणांनाच अटक केली. तसेच सिदार्थ शहा यास चौकशीशिवाय जाऊ दिल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता.