समीरला मिळणार 'जपमाळ'
By admin | Published: February 7, 2017 05:12 AM2017-02-07T05:12:04+5:302017-02-07T05:12:04+5:30
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला सुरक्षेअभावी सोमवारी न्यायालयात हजर करण्यास कारागृह अधीक्षकांनी
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला सुरक्षेअभावी सोमवारी न्यायालयात हजर करण्यास कारागृह अधीक्षकांनी असमर्थता दर्शविली तसेच संशयित आरोपी समीर गायकवाड याला ‘सनातन’चे गोमूत्र आणि अगरबत्ती देण्याची त्याच्या वकिलांची मागणी न्यायाधीशांनी फेटाळली तर फक्त जपमाळा देण्यासच परवानगी देण्यात आली. याबाबतची पुढील सुनावणी दि. २८ फेब्रुवारीला ठेवली आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर येथील न्यायसंकुलामध्ये सुनावणी सुरू आहे.
दुपारी तीनच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. तत्पूर्वी सकाळी तपासी अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या खटल्यातील तपासासंदर्भातील अहवाल व संशयित आरोपींच्या वकिलांच्या मागणी अर्जावरील आक्षेपाचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने समीर गायकवाड व डॉ. वीरेंद्र तावडे यांना न्यायालयात हजर करू शकत नसल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले.
आरोपीच्या वकिलांनी समीर गायकवाड याला पोटविकाराचा त्रास असल्याने प्रभावी औषध म्हणून ‘सनातन’चे गोमूत्र, ध्यानधारणेसाठी अगरबत्ती आणि जपमाळा देण्याची मागणी केली होती. यावर सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी आक्षेप नोंदवला. (प्रतिनिधी)