सत्तातर मोदीलाट कायम
By admin | Published: October 20, 2014 06:29 AM2014-10-20T06:29:10+5:302014-10-20T06:29:10+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या आहेत. स्वतंत्र लढूनदेखील बहुमताच्या जवळपास जाणारे यश भाजपाला मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा राहिला.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या आहेत. स्वतंत्र लढूनदेखील बहुमताच्या जवळपास जाणारे यश भाजपाला मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांनी केलेल्या एकहाती प्रचाराचे हे यश आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला ४२ जागांवर यश मिळाले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत किमान २४० जागांवर आघाडी मिळेल, असा विश्वास राज्यातील भाजपा नेत्यांना होता. त्याकरिता शिवसेनेबरोबर असलेली २५ वर्षांची युती भाजपाने तोडली. यापूर्वी भाजपा ११९, तर शिवसेना १६९ जागा लढत होती. युतीच्या जागावाटपात भाजपाला १३५ पेक्षाही कमी जागा मिळत असल्याचे दिसताच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय योग्यच होता, हे निकालाने दाखवून दिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आयात केलेल्या नेत्यांवरून खूप टीका झाली. पण निवडून आलेल्या १२२ जणांमध्ये ३०हून अधिक आयारामांचा समावेश आहे. त्यामुळे तो निर्णयही भाजपाच्या पथ्यावरच पडला. खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे जनाधार असलेल्या नेत्याची पोकळी भाजपामध्ये निर्माण झाली होती. विशेषत: ओबीसी समाजातील नेतृत्व नव्हते. पण पंकजा मुंडे यांना संघर्ष यात्रेवर पाठवून ती पोकळी भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. विदर्भात नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवर, खान्देशात एकनाथ खडसे, प. महाराष्ट्रात राजू शेट्टी, महादेव जानकर आदी मित्रपक्षांचे नेते, मराठवाड्यात पंकजा, मुंबईत विनोद तावडे अशी तगडी टीम प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली. मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा पुढे न करता सामूहिक नेतृत्व उभे केल्याने राज्यात भाजपाच्या जागा वाढल्या. २००९ ला मिळालेल्या ४६ जागांवरून १२२ जागांवर भाजपाला मजल मारता आली. त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली.
प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पराभूत करण्याकरिता भाजपाने वेचून वेचून बिभीषण गोळा केले होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी उभी केलेली प्रचार यंत्रणा आणि मोदींच्या २७ सभांचा झंझावात असे समीकरण जुळून आल्याने भाजपाला यश प्राप्त झाले. भाजपाने जिंकलेल्या जागा पाहता, गेल्या वेळपेक्षा किमान ७५हून अधिक जागांची वाढ झाली आहे. बहुमताचा जादूई आकडा गाठता आला नाही, तरी सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ असल्याने राज्यपाल भाजपालाच पाचारण करणार, हे उघड आहे. पाठिंबा कोणाचा, राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा, एवढाच काय तो प्रश्न आहे!