म्हाडाच्या अध्यक्षपदी समरजित घाटगे

By admin | Published: April 10, 2017 06:59 PM2017-04-10T18:59:37+5:302017-04-10T18:59:37+5:30

समरजित विक्रमसिंह घाटगे यांची सोमवारी शासनाने पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अध्यक्षपदी तीन वर्षांसाठी रितसर नियुक्ती केली.

Samratjit Ghatge as MHADA president | म्हाडाच्या अध्यक्षपदी समरजित घाटगे

म्हाडाच्या अध्यक्षपदी समरजित घाटगे

Next

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 10 - कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि अलिकडेच भाजपामध्ये प्रवेश केलेले नेते समरजित विक्रमसिंह घाटगे यांची सोमवारी शासनाने पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अध्यक्षपदी तीन वर्षांसाठी रितसर नियुक्ती केली. गृहनिर्माण विभागाने त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घाटगे यांना हे पद देण्याचे जाहीर केले होते. आता समरजित हे कागल विधानसभेचे संभाव्य उमेदवारही असू शकतात.

दिवंगत विक्रमसिंह घाटगे हे १९७८ ते ८५ च्या काळात काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर या गटाकडे तालुक्यात महत्वाचे सत्तेचे पद नव्हते. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात कुणाला तरी पाठिंबा देत या गटाची वाटचाल सुरू राहिली. परंतु समरजित यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर भाजपच्या चिन्हांवर लढवली आणि गटाची पुनर्बांधणी केली. तालुकाभर दौरे काढून त्यांनी पक्ष संघटन मजबूत केले. दोन्ही निवडणुकीत त्यांना गुलाल मिळाला नसला तरी किमान चाळीस हजार मतांचा गठ्ठा या गटाकडे आहे हे त्यांनी दाखवून दिले. राजकीय दृष्ट्या पूर्वीचा कोणत्याही पक्षाचा शिक्का त्यांच्यावर नाही. तरुण वय, स्वच्छ प्रतिमा आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. आता ही सत्तेची संधी मिळाल्याने घाटगे गटाला उभारी मिळाली. कागल विधानसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

कागल तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे संजय मंडलिक व संजय घाटगे अशी राजकीय वाटणी आहे. तिथे भाजपला झेंडा हातात घ्यायलाच कुणी नव्हते. ते हेरून पालकमंत्री पाटील यांनीच शब्द देऊन समरजित यांना भाजपामध्ये घेतले. आॅक्टोबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हाच दानवे यांनी म्हाडाचे अध्यक्षपद देण्याचे जाहीर केले होते. कागल नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांनी समरजित यांच्या लालदिव्याची चिंता करू नये तो आम्ही त्यांना देणार आहेच असे जाहीर केले होते. परंतु नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणुका व अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे ही नियुक्ती लांबली होती. त्यावर अखेर सोमवारी शिक्कामोर्तब झाले आणि कागल तालुक्यात घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याबध्दल जोरदार आनंद व्यक्त केला.

राज्यमंत्रिपदाचा दर्जा

काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे हे या मंडळाचे सहा वर्षे अध्यक्ष होते. कोल्हापूरसह सांगली,सातारा,पुणे आणि सोलापूर हे या मंडळाचे कार्यक्षेत्र आहे. मंडळाचे मुख्यालय पुण्यात असून कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी प्रामुख्याने गृहनिर्माण योजना या मंडळातर्फे राबविल्या जातात. मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दाखविलेल्या विश्वासास नक्की पात्र राहू. हे पद मिळाल्याने आमच्या गटाला उभारी आली असून कार्यकर्त्यांनाही आनंद झाला आहे.
- समरजित घाटगे
अध्यक्ष, पुणे विभागीय म्हाडा मंडळ

Web Title: Samratjit Ghatge as MHADA president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.