‘समृद्धी’ने मिळविले 215 कोटी; महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 12:33 PM2023-10-22T12:33:01+5:302023-10-22T12:33:48+5:30

गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातामुळे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वैशिष्ट्यांपेक्षा अपघातांमुळे अधिक चर्चेत राहिलेल्या या महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक ठरेल.

samruddhi mahamarg earned 215 crore | ‘समृद्धी’ने मिळविले 215 कोटी; महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक

‘समृद्धी’ने मिळविले 215 कोटी; महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक

देशातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती मार्ग म्हणून नावारूपाला आलेला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग गेल्या सात-आठ वर्षांपासून सत्ताधारी-विरोधक अशा सर्व पक्षीयांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. त्यामुळेच या मार्गावर जरा खुट्ट झाले तरी त्याची राष्ट्रीय स्तरावर बातमी होते. हा द्रुतगती महामार्ग मुंबई आणि नागपूर या  शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी व्हावे, केवळ याच उद्देशाने बांधण्यात आलेला नाही. तर त्याच्या कवेत येणाऱ्या सर्व जिल्हे-तालुके-गावांमध्ये आर्थिक विकासाची गंगा खेळविण्याचा व्यापक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्देशाची पूर्तता होईल तेव्हा होवो पण सध्या तरी अपघातांच्या मालिकेमुळे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अधिक चर्चिला जात आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. कोणत्याही पायाभूत प्रकल्पाचे नियोजन करतेवेळी त्यातील गुंतवणुकीची फेरवसुली कशी करता येईल, याचे काही ठोस आडाखे बांधलेले असतात. समृद्धी महामार्ग प्रकल्प या नियमास अपवाद नाही. त्यामुळे तूर्त तरी टोलच्या माध्यमातून प्रकल्पाच्या खर्चाची वसुली हे आर्थिक प्रारूप प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मांडण्यात आले आहे.

बांधकामाचा खर्च

दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडत जाणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. एमएसआरडीसीने त्यासाठी विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून २८ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. विहित करारानुसार कर्जाची परतफेड २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून सुरू होणार असून, पुढील किमान २५ वर्षांपर्यंत ही परतफेड सुरू राहील. याशिवाय म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, एसआरए, एमआयडीसी यांनी साडेपाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात केली आहे.

उद्घाटनापासून जूनपर्यंत झालेली महिनानिहाय टोलवसुली (रुपयांत)

डिसेंबर, २०२२ : १३,१७,७२,३१२
जानेवारी, २०२३ : २८,५३,२३,४८३
फेब्रुवारी : ३०,४७,५१,९६७
मार्च : ३४,२३,०३,२२०
एप्रिल : ३३,२०,२८,९८४
मे : ३६,५८,४०,७२१
जून : ३९,५४,०१,१३६

खर्चाची वसुली कशी?

महामार्गावर बांधण्यात आलेल्या एंट्री व एक्झिट पॉइंटला टोलनाक्यांची उभारणी केली आहे. प्रतिकिमी १.७१ रुपयांप्रमाणे समृद्धी महामार्गावर टोल आकारणी केली जाते. नागपूर ते भरवीर या ६०० किमीच्या पहिल्या टप्प्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ५० लाख वाहनांची वर्दळ झाली. या कालावधीतील अपघातांत १४० लोकांचा मृत्यू झाला.


 

Web Title: samruddhi mahamarg earned 215 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.