CoronaVirus News: कोरोनामुळे समृद्धी महामार्गाचा मुहूर्त हुकणार; पहिला टप्पा दोन महिनेे लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 01:07 AM2021-04-07T01:07:59+5:302021-04-07T07:00:51+5:30
नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून त्यापैकी नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा रस्ता १ मेपर्यंत खुला होईल, असे सांगण्यात येत होते; परंतु समृद्धी महामार्गाच्या बांधकामात कार्यरत असलेल्या अनेक कामगार तसेच पर्यवेक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याने कामात अडथळे निर्माण झाले आहेत.
- विनय उपासनी
मुंबई : महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा नागपूर ते शिर्डी हा सुमारे ५२० किमी लांबीचा टप्पा महाराष्ट्रदिनी सुरू करण्याचा मुहूर्त किमान दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे महामार्गाच्या बांधकामावर परिणाम झाला आहे.
नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून त्यापैकी नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा रस्ता १ मेपर्यंत खुला होईल, असे सांगण्यात येत होते; परंतु समृद्धी महामार्गाच्या बांधकामात कार्यरत असलेल्या अनेक कामगार तसेच पर्यवेक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याने कामात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असल्याने नागपूर व वर्धा या दोन पॅकेजला होणाऱ्या बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या असून, त्याचा थेट परिणाम समृद्धी महामार्गाच्या बांधकामावर झाला आहे.
१६ विभागांत काम सुरू
समृद्धी महामार्गाचे बांधकाम १६ विभागांत प्रगतिपथावर असून त्यासाठी विविध राज्यांतून आलेले सुमारे ३० हजार मजूर कार्यरत आहेत.
मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मजुरांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावली आहे. त्यातच पर्यवेक्षकांनाही कोरोनाची बाधा झाल्याने बांधकामात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
संरक्षक भिंत, पेट्रोल पंप उभारणीत अडथळे
७०१किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. तसेच सुमारे २० ठिकाणी पेट्रोल पंपांची निर्मिती केली जाणार आहे; परंतु कोरोनाने कामगार वर्गाच्या रोडावलेल्या संख्येमुळे या दोन्ही कामांच्या प्रगतीवर परिणाम झाला आहे.
सातत्याने ग्राउंड वर्कचा आढावा घेत आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समृद्धी महामार्गाच्या बांधकामावर झालेल्या परिणामाचा आढावा घेऊन बांधकामाचे पॅकेजनिहाय पुनर्नियोजन आम्ही करत आहोत.
- राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
कोठे, किती बाधा?
नाशिक (पूर्व) : ९६ मजूर
नाशिक (पश्चिम) : १७५ मजूर होळीनिमित्त गावी गेले असून कोरोनाच्या भीतीने परत येण्यास विलंब होत आहे
जालना : ४२ (त्यापैकी १२ पर्यवेक्षक आणि २३ मजूर)