समृद्धी महामार्ग २ मेपासून खुला होणार, एकनाथ शिंदे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 08:10 AM2022-04-16T08:10:12+5:302022-04-16T08:10:29+5:30
महाराष्ट्राच्या समृद्धीची द्वारं खुली करणारा मुंबई - नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग २ मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
वैजापूर (जि. औरंगाबाद) :
महाराष्ट्राच्या समृद्धीची द्वारं खुली करणारा मुंबई - नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग २ मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैजापूर येथे एका कार्यक्रमात शुक्रवारी ही माहिती दिली.
समृद्धी महामार्ग सुरू करण्याच्या अनेक तारखा जाहीर झाल्या. परंतु बरीच कामे अर्धवट स्थितीत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अद्याप सुरू होऊ शकला नाही. नागपूर ते शेलू बाजारपर्यंत काम पूर्ण झाल्याने शेलूपर्यंत हा रस्ता सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्रात दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यासाठी रस्त्याचे जाळे उभे करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार असा २१० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हे ७०० किलोमीटर अंतर केवळ ६ ते ७ तासांत पूर्ण करता येईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. स्मार्ट सिटीसाठी काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध काम करणार नाही, असे त्यांनी सांगितले.