समृद्धी महामार्गामुळे चेहरामोहरा बदलेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 04:24 AM2018-02-19T04:24:27+5:302018-02-19T04:24:45+5:30
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार असून हा महामार्ग राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
मुंबई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार असून हा महामार्ग राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कर्न्व्हजन्स २०१८’ या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर झाले. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, रामदास आठवले, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह देशविदेशातील प्रख्यात उद्योगपती मंचावर उपस्थित होते.
एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणारे महाराष्टÑ हे देशातील पहिले राज्य असेल, असे सांगून मोदी म्हणाले, देशातील सर्व राज्यांमध्ये विकासाची स्पर्धा आज होत आहे. गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न सगळेच करीत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचे पर्व आणखी पुढे गेले आहे. ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’द्वारे त्यांनी सुधारणांचे आणि मानवी हस्तक्षेप कमी करणारे निर्णय घेतल्याने आणि कालमर्यादेत निर्णय घेणारे वर्क कल्चर आणल्याने आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्यावर्षी देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात (५१ टक्के)आली.
मेक इन इंडियात दोन वर्षापूर्वी झालेल्या करारांपैकी निम्मेपेक्षा अधिक प्रगतीपथावर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
टाटा म्हणतात,
महाराष्ट्र अतुल्य
टाटा समूहातील पहिल्या कंपनीची सुरूवात १८७७ मध्ये नागपुरात झाली. इतक्या वर्षांचा अनुभव, येथील वास्तव्य व आजच्या नेतृत्त्वाबद्दलचा अनुभव यावरुन मी सांगतो की महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी अतूल्य आहे. टाटांकडून या राज्याला कायम सहकार्य मिळत राहील, अशी
ग्वाही प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी दिली.
राज्यात गुंतवणूकअनुकुल वातावरण तयार केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्यासह नामवंत उद्योगपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली. इझ आॅफ डुर्इंग बिझनेसह कालमर्यादेत ते घेत असलेल्या निर्णयांचे टाटा-अंबानींसह सर्वांनीच कौतूक केले.
शिवसेनेचा सहभाग केवळ देसार्इंपुरताच
आजच्या उद्घाटन समारंभात शिवसेनेचा सहभाग हा केवळ उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यापुरताच मर्यादित राहिला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परिषदेला पाठ दाखविली. शिवसेनेचे अन्य मंत्री वा नेते फिरकले नाहीत.