सॅमसंग मोबाइलचा स्फोट, एक जण जखमी
By admin | Published: May 16, 2017 01:49 PM2017-05-16T13:49:29+5:302017-05-16T13:49:29+5:30
अंबाजोगाई येथील एक महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पॅन्टमधील खिशात ठेवलेल्या सॅमसंग कंपनीच्या मोबाइलने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 16 - अंबाजोगाई येथील एक महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पॅन्टमधील खिशात ठेवलेल्या सॅमसंग कंपनीच्या मोबाइलने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
अंबाजोगाईतील एका महाविद्यालयात प्रशासकीय अधिकारीपदी असणारे पद्माकर अनुरथ चव्हाण यांनी २ मार्च २०१७ रोजी अंबाजोगाईतील एका दुकानातून सॅमसंग सी-९ प्रो हा मोबाइल ३६ हजार ९०० रूपयांना खरेदी केला होता. रविवार(१४ मे) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते मोबाइल पॅन्टच्या खिशात ठेऊन महाविद्यालयाच्या प्रांगणात एका कारमध्ये बसले होते.
अचानक त्यांना पॅन्टच्या खिशात पोळल्यासारखे झाल्याने पाहिले असता त्यांना खिशातील मोबाइलचा स्फोट होऊन धूर येताना दिसला. त्यांनी घाबरुन तातडीने मोबाइल बाहेर काढून फेकण्याचा प्रयत्न केला, पण मोबाइल गाडीतच पडला आणि कारची मॅटिंग जळाली. नंतर त्यांनी मोबाइल मोकळ्या मैदानात फेकला. या घटनेत पद्माकर चव्हाण यांच्या मांडीला किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, चव्हाण यांनी सॅमसंग कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला संपर्क साधला असता त्यांनी तक्रार दाखल करून घेतली असून त्यावर अद्याप काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.